पवारांच्या कानपिचक्या:आरोप टाळा, कामाला लागा !

October 9, 2013 10:50 PM0 commentsViews: 862

pawarnew09 ऑक्टोबर : निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झालीय यासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. यात शरद पवारांनी पक्षातल्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्याचं कळतंय. निवडणुका तोंडावर आल्या असून यापुढे नेत्यांवर कोणतेही आरोप होणार नाहीत याची काळजी घ्या, असा इशारा पवारांनी मंत्र्यांना दिल्याचं कळतंय.

 

अलीकडेच माणिकराव ठाकरे यांनी 19-29 असा फॉर्म्युला असावा असं विधान केलं होतं. तर राष्ट्रवादीने 22-26 असा फॉर्म्युला कायम असावा अशी मागणी केली होती. 22-26 असाच फॉर्म्युला राहिलं आणि याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं पवारांनी या बैठकीत सांगितलं.

 

तसंच एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील या भ्रमात राहु नका, केंद्रात तेलंगणाच्या मुद्यावर नाजूक परिस्थिती आहे. त्यामुळे एखाद्यावेळेस येणार्‍या अधिवेशानात सरकार अल्पमतात जाऊन निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे कामाला लागा असे आदेशही पवारांनी दिलेत.

 

राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आणि आगामी निवडणुकीच्या तयारी बाबत चर्चा झाली. काँग्रेससोबत जागावाटपाच्या मुद्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रचाराला सुरूवात केली पाहिजे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तर जागावाटपाच्या मुद्यावर दिल्लीत पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असून येणार्‍या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि काँग्रेसने केलेल्य कुरघोडीमुळे राष्ट्रवादीत चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात खुद्द शरद पवारांनी दुसर्‍यांदा बैठक घेऊन राजकीय हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

close