क्रिकेटशिवाय आयुष्याची कल्पनाच अशक्य -सचिन

October 10, 2013 10:51 PM0 commentsViews: 982

10 ऑक्टोबर : अखेर तो दिवस आलाय..मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरनं क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. गेली चोवीस वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवाणारा सचिन तेंडुलकर आता थांबणार आहे. विंडीजविरुद्धची दुसरी टेस्ट ही सचिनची शेवटची टेस्ट असेल आणि या मॅचनंतर एका महान पर्वाचा अस्त होणार आहे.

 
सचिन म्हणतो…
‘माझ्या संपूर्ण जीवनात भारतासाठी क्रिकेट खेळणं हेच माझं स्वप्न होतं. गेल्या 24 वर्षांपासून हेच स्वप्न मी जगलोय. वयाच्या 11 व्या वर्षांपासून मी क्रिकेट खेळतोय. त्यामुळे क्रिकेटशिवायच्या आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि जगभरात क्रिकेट खेळणं हा माझ्यासाठी गौरव आहे. देशात 200 वी मॅच खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.’

 
आणि या शब्दांनंतर क्रिकेटमधली एक सर्वोत्तम कारकीर्द संपुष्टात आलंय. गेली 24 वर्ष ज्यानं क्रिकेट जगतावर आणि फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवलं तो सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटला अलविदा करणार आहे. आपल्या निवृत्तीची घोषणा करत सचिननं सर्व देशवासियांचे आभार मानलेत.

 
‘इतकी वर्षं माझ्यासाठी सर्व काही करणार्‍या आणि मला वाटलं तेव्हा मला निवृत्तीची परवानगी देणार्‍या बीसीसीआयचा मी आभारी आहे. माझ्या कुटुंबीयांनी जो संयम आणि समज दाखवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो. त्यांची प्रार्थना आणि त्यांच्या सदिच्छामुळेच मला पुढे जाण्याचं आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याचं बळ मिळालं.’

 
गेल्या काही काळापासून सचिनची निवृत्तीची चर्चा सुरु होती. बीसीसीआयनं सचिनवर निवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या बातम्याही आल्या आणि म्हणूनच बोर्डाने विंडीज दौर्‍याचं इतक्या घाईघाईत आयोजन केलं की काय याबद्दलही चर्चा झाली. पण बोर्डाने या गोष्टीला सातत्यानं नकार दिला. पण हे सत्य आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिनच्या चेहर्‍यावर थकवा जाणवत होता. यावर्षाच्या सुरुवातीला त्यानं पहिल्यांदा वन डे आणि त्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली. तर चॅम्पियन्स लीगमध्ये त्याला सुरुवातीला फॉर्म सापडला नाही. पण अखेर मुंबईनं सचिनला विजयी गिफ्ट दिलचं.आता 18 नोव्हेंबरला सचिन अखेरचा मैदानात उतरेल.तो क्षण प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अनमोल असेल.

close