तेलंगणाविरोधी आंदोलन सरकारने हाणून पाडले

October 11, 2013 11:23 PM0 commentsViews: 370

chandrababu11 ऑक्टोबर : एकीकडे आंध्रप्रदेशमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणाविरोधातलं तिथलं आंदोलन जवळपास बारगळलंय. तर दुसरीकडे नेत्यांचं उपोषणही सरकारनं हाणून पाडलंय. नवी दिल्लीत उपोषण करणारे तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.

 

उपोषणाच्या ठिकाणावरून दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं हलवलं. दुपारी चारच्या सुमाराला आंध्रप्रदेश भवनजवळ मोठं नाटक घडलं. दुपारी पोलीस उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाले. आणि त्यांनी चंद्राबाबूंना ते ठिकाण सोडण्याची सूचना केली. चंद्राबाबूंनी तिथून हटायला नकार दिला.

 

त्यामुळे पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं ऍम्ब्युलन्समध्ये बसवलं आणि राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये नेलं. 5 दिवसांच्या उपोषणामुळे चंद्राबाबूंची प्रकृती खालावत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे संतापलेल्या तेलुगु देसमच्या कार्यकर्त्यांनी आंध्रप्रदेश भवनाजवळ निदर्शनं केली. बुधवारी रात्री आंध्रप्रदेश पोलिसांनी हैदराबादमध्ये उपोषण करणारे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनांही जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

close