दसर्‍या मेळाव्यात उद्धव ठाकरे जोशींना सुनावणार खडे बोल

October 12, 2013 4:41 PM0 commentsViews: 2254

udhav on joshi13 ऑक्टोबर : बाळासाहेबांचं स्मारक न होण्यास नेतृत्व कमकुवत असल्याचं खळबळजनक वक्तव्य करणार्‍या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गंभीर दखल घेतलीय. उद्या रविवारी होणार्‍या दसर्‍या मेळाव्यात उद्धव ठाकरे जोशींना खडे बोल सुनावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

यापुढे अशी आगळीक कुठल्याही शिवसैनिकाकडून अथवा नेत्याकडून खपवून घेतली जाणार नाही. अशा स्वरूपाची भूमिका उद्धव उद्याच्या दसरा मेळाव्यात मांडणार असल्याची शिवसेनेतल्या सूत्रांनी माहिती दिलीय. उद्धव ठाकरे उद्याच्या भाषणातून एक प्रकारे शिवसेनेतल्या प्रत्येकासाठी ‘कोड ऑफ कंडक्ट ‘ स्वरुपाची धोरणात्मक भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय.

 
शुक्रवारी मनोहर जोशींनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. जर बाळासाहेब हयात असते आणि त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं स्मारक बांधायचं असतं आणि या सरकारने विरोध केला असतात तर हे सरकार त्यांनी पाडून दाखवलं असतं अशी भूमिका मांडत जोशी सरांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला हाणला होता. त्यांच्या या विधानामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

 

विशेष म्हणजे लोकसभेच्या जागेचं तिकीट जोशी सरांना देण्यात येणार नसल्यामुळे जोशी अत्यंत नाराज होते. त्यातच गुरूवारी मनोहर जोशी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि शुक्रवारी नवरात्रोत्वाच्या एका कार्यक्रमात उद्धव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जोशी सरांच्या या विधानावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. जोशी यांना तिकीट मिळत नाही याची खात्री त्यांना झाली म्हणून त्यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी आणि पक्षाच्या मुळावर घाव घालण्यासाठी असं विधान केलं असून हे चुकीचं आहे अशा शब्दात रामदास कदम यांनी जोशी सरांना फटकारलं.

 

बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शिवाजी पार्कवर अर्थात सेनेच्या शिवतीर्थावर मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवरच होईल अशी घोषणा केली होती. आणि त्याच मुद्द्यावरून जोशींनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला. आता योग असा जुळून आलाय की ज्या शिवतीर्थीवरून सरांनी घोषणा केली त्याच शिवतीर्थावर उद्या होणार्‍या दसर्‍या मेळाव्यात उद्धव ठाकरे सरांना खडेबोल सुनावणार आहे. आता उद्धव ठाकरे उद्या काय ऍक्शन घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
 

close