शिवतीर्थावर घुमणार आवाज शिवसेनेचा !

October 13, 2013 5:10 PM0 commentsViews: 1234

विनोद तळेकर,मुंबई
13 ऑक्टोबर : आज शिवसेनेचा 48 वा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. हायकोर्टाने सशर्त परवानगी दिल्यानंतर हा मेळावा पार पाडणं हे शिवसेनेसाठी आव्हान आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या निधनानंतर होणारा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. पण आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा अनेक अर्थानं महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा…. आवाज कुणाचा..शिवसेनेचा…अशा गगनभेदी घोषणा देत शिवाजी पार्कवर धडकणारे शिवसैनिकांचे जथ्थे…मैदानात डौलानं फडकणारे भगवे ध्वज… हे वातावरण यंदाही शिवाजी पार्कवर पाहायला मिळेल. कारण मुंबई हायकोर्टाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिलीय.
सर्वसामान्य शिवसैनिकांच्या लेखी दसरा मेळाव्याचं महत्व फार मोठं आहे. याच व्यासपीठावरुन बाळासाहेब संपूर्ण वर्षाचा राजकीय अजेंडा शिवसैनिकांसमोर मांडायचे. फक्त शिवसैनिकच नाही, तर इतर राजकीय पक्षही दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या भाषणावर लक्ष ठेवून असायचे. आपल्या खास ठाकरी शैलीतून बाळासाहेबांनी या व्यासपीठावरुन भल्या भल्या दिग्गज नेत्यांचा समाचार घेतलाय. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हा मेळावा अशा पध्दतीने एक आगळं वेगळं महत्व राखून आहे.
गेली साडेचार दशकं एक नेता. एक विचार…एक मैदान असं या दसरा मेळाव्याचं वर्णन केलं जातं. यावर्षी मैदान तेच असेल नेताही तोच असेल. पण नसेल तो नेता. ज्याने शिवसेना उभी केली. यंदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे पहिल्यादांच दसरा मेळाव्यातून भाषण करणार आहेत. या भाषणातून ते राजकीय टोलेबाजी करतीलच, पण बाळासाहेबांनंतर ही संघटना माझ्या हाती सुरक्षित आहे, हा विश्वासही त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांना दाखवावा लागेल. खरंतर हे या दसरा मेळाव्यातलं त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असेल. स्वत:च्या प्रकृतीच्या कुरबुरी, पक्षातली अस्वस्थता आणि कार्यकर्त्यांशी हरवलेला संवाद या बाबींवर मात करत उद्धव ठाकरेंना हे आव्हान पेलावंच लागेल.

close