मोहन धारिया यांचा जीवन प्रवास

October 14, 2013 10:22 PM0 commentsViews: 212

4 ऑक्टोबर :  सामाजिक भान असणारे राजकारणी अशी ओळख असणारं पुण्यातलं एक ज्येष्ठ व्यक्तीमत्व म्हणजे मोहन धारिया..मुळचे कोकणातले असणारे धारिया पुण्यामध्ये आले ते शिक्षणासाठी. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकताना त्यांनी कॉलेज सोडून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचं राजकारणाशी नातं जोडलं गेलं ते कायमचंच. राष्ट्रीय राजकारणातला पुण्याचा चेहरा अशी प्रतिमा धारिया यांना लाभली.

 

इंदिरा गांधींच्या हातात देशाची सूत्र पहिल्यांदा आली तेव्हा चंद्रशेखर यांच्यासह धारिया इंदिरा गांधी यांच्या पाठीशी उभे राहिले. राज्यसभेची निवडणूक जिंकून ते केंद्रात राज्यमंत्री झाले. लोक कल्याणकारी आणि समाजवादी धोरणाचा पाठपुरावा त्यांनी केला. पक्षात राहूनही पक्षक्षेष्ठींशी संघर्ष करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी पुकारली तेव्हा त्यांनी त्याचा निषेध करायला मंत्रिमंडळातून बाहेर पडायचं धाडसही दाखवलं होतं. राजकारण आणि वैयक्तिक नाती मात्र त्यांनी कायम वेगळी ठेवली.

 
वनराईच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक काम शेवटपर्यंत सुरुच होतं.वनीकरण आणि ग्रामीण विकास उभारून खेड्याकडे परत चला ही चळवळ हा मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.सगळ्याच पक्षातल्या लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळेच त्यांच्या या जाण्यानं हळहळ व्यक्त होतेय. धारिय यांना आयबीएन लोकमतची श्रद्धांजली.

close