जोशी सराचं काय चुकलं?

October 14, 2013 11:00 PM1 commentViews: 3761

विनोद तळेकर,मुंबई
14 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मनोहर जोशीचं पुढे काय होणार हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. शिवसेनेतल्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या वाट्याला जी मानहानी आली, ती त्यांनी आपणच ओढवून घेतली अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. जोशी सराचं काय चुकलं? पाहूयात एक रिपोर्ट

 

 
प्रत्येक दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या शेजारी बसणार्‍या असलेल्या मनोहर जोशींना.. बाळासाहेबांनतरच्या पहिल्याच दसरा मेळाव्यात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गेली पावणे पाच दशकं ज्या नेत्याने शिवसेनेतली प्रत्येक घडामोड जवळून पाहिली. अनेक महत्वाच्या निर्णयात त्यांचा शब्द ग्राह्य धरला जायचा आणि बाळासाहेबांचं भाषणही त्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नसे त्या मनोहर जोशींना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून पायउतार होण्याची नामुष्की सहन करावी लागली. पण त्यांना मिळालेल्या वागणुकीला तेच जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे.

 

 
उद्धव ठाकरेंवर केलेली टीका हे जरी नेतृत्वाचा रोष ओढवून घेण्याचं तत्कालीन कारण वाटत असलं तरी ते एकमेव कारण नाही .दादरमधला पराभव आणि बाळासाहेबांचं रखडलेलं स्मारक या दोन गोष्टींना फक्त जोशींची त्या वेळची भूमिका कारणीभूत ठरल्याचा नेतृत्वाचा समज आहे. तसंच पक्षनेतृत्वाचा आदेश डावलून एखाद्या वादग्रस्त विधान करणं,पक्षाच्या धोरणाविरोधात जाहीर वक्तव्यं करणं अशा बाबीही जोशींच्या विरोधात जात होत्या.

 

 
शिवसेनेतून जेव्हा जेव्हा एखादा मोठा नेता बाहेर पडला,तेव्हा तेव्हा त्याचा फटका पक्षाला बसलाय. मग ते गणेश नाईक असोत,भुजबळ असोत किंवा राज ठाकरे..पण जोशींच्या जाण्याने पक्षाला फटका बसेल अशी शक्यता नाही. त्यामुळे जोशी बाहेर पडत असतील तर त्यांना थांबवण्याचे प्रयत्नही होणार नाहीत. आणि उपद्रवमूल्य नसल्याने त्यांना बाहेरही फारशी संधी मिळण्याची शक्यता नाही.

 

 
जोशींनी शिवसेनेतर्फे सगळी पदं उपभोगली. पण त्या माध्यमातून पक्षाला त्यांनी काहीच दिलं नाही. त्यामुळे दोन चार कार्यकर्त्यांव्यतिरिक्त त्यांच्या भोवती कुणीच नाही. आणि अशी परिस्थिती आपल्यावर कधीकाळी ओढवेल अशी कल्पनाही न केल्याने जोशींकडे पर्यायी योजना नाही. त्यामुळे जोशी पक्षाबाहेर पडतील अशी शक्यता नाही. आणि पक्षही लगेचच त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करेल अशी शक्यता नाही. त्यामुळे जोशींना पक्षात दुर्लक्षित होऊन राहण्याशिवाय पर्याय नाही.

  • umesh jamsandekar

    जोशी सर,जे घडल ते अत्यंत वाईट घडल,शिवसेना आणि आपण यांच घट्ट नात आहे आणि या नात्याला तडा देवून या वयात काही मिळवण्याचा अविचार न करता शांत राहा. आपला आदर ठेवून बाळासाहेबांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त दिल त्या बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ह्या तरुण नेतृत्वाशी जुळवून घ्या. आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांना आपल्या निष्ठेने चोख उत्तर द्या. जय -महाराष्ट्र !!

close