मनोहर जोशी ‘नॉट रिचेबल’!

October 15, 2013 4:58 PM0 commentsViews: 1417

manohar joshi on15 ऑक्टोबर : मनोहर जोशी गेले कुठे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सध्या अनरिचेबल आहेत, गेल्या 24 तासांपासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. सर अज्ञात स्थळी गेले? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पण या मेळाव्याला गालबोट लागलं. मेळाव्याच्या एक दिवसाअगोदर मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ऐतिहासिक दसर्‍या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते व्यासपीठावर दाखल झाले. त्यानंतर मनोहर जोशी थोडे उशिरा पोहचत व्यासपीठावर दाखल झाले.

 

व्यासपीठावर दाखल झाल्यावर जोशींनी उद्धव यांचा हात हातात घेऊ वाकून नमस्कार केला. मात्र जोशी सर व्यासपीठावर दाखल होताच शिवसैनिकांनी ‘मनोहर जोशी हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी हात उंचावून शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण तरीही शिवसैनिकांच्या घोषणा सुरूच होत्या. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी व्यासपीठावरून खाली उतरून शिवसैनिकांना शांत राहण्याची विनंती केली मात्र याचाही काहीही उपयोग झाला नाही.

 

अखेरीस जोशी सर खुर्चीवरून उठले आणि व्यासपीठावरून खाली उतरले. यावेळी खुद्द उद्धव ठाकरेच काय तर शिवसेनेचा इतर कोणताही नेता जोशी सरांना थांबवण्यासाठी पुढे सरकला नाही. जोशी सर खिन्नमनाने व्यासपीठावरून खाली उतरले आणि घरी निघून गेले. अनेक मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी बसून शिवतीर्थावर जमलेला शिवसैनिकांना जोशी सरांनी जवळून पाहिलं,अनुभवलं पण बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात सरांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागल्यामुळे जोशी खिन्न झालेत. झालेला प्रकार हा गैरसमजातून झाला,मीही शिवसैनिक आहे अशी प्रतिक्रिया जोशींनी दिली. मेळाव्याच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी मनोहर जोशी मुंबईबाहेर गेले. सर आपल्या मूळ गावी नांदवीत गेल्याची चर्चा होती. पण नांदवीतल्या घरीही सर आले नाहीत. त्यामुळे सर गेले कुठे या चर्चेला उधाण आलंय.

close