जोशींमुळेच अनेक नेते शिवसेनेबाहेर गेले-भुजबळ

October 15, 2013 8:36 PM0 commentsViews: 2152

15 ऑक्टोबर : दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आणि या मेळाव्यात ज्यांनी शिवसेनेत अनेक पद भुषवली म्हणा की लाटली असे मनोहर जोशी यांना असं अपमानित होऊन व्यासपीठावरुन उतरावे लागले हा त्यांच्यावर नियतीनं उगवलेला सूड आहे अशी उपरोधिक टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि एकेकाळचे शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांनी केली. तसंच जोशी यांनी अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांना पक्षातून घालवलं असा खळबळजनक खुलासाही भुजबळ यांनी केला.

 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या मनोहर जोशी यांना दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी घरचा रस्ता दाखवला. या प्रकारमुळे जोशींना मोठा धक्का बसलाय. गेल्या दोन दिवसांपासून जोशी सर अज्ञातवासात गेले आहे. शिवसेनेत एकेकाळी त्यांच्यासोबत असणारे आणि आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोशींवर घडलेल्या प्रकाराचा चांगलाच समाचार घेतला. मी, वामनराव महाडीक, दत्ताजी साळवे असे अनेक नेते सेनेत होतो. बाळासाहेबांचा जो अभेद्द तोफखाना होता. त्याला बाहेरचे लोकं कधीच भेदू शकत नव्हते पण ते काम मनोहर जोशी यांनी चोख केलं. सगळे गेले, सगळ्यांना घालवलं आणि आता स्वत:ही गेले. ते गेले की नाही ते त्यांचं त्यांना माहीत असा टोला भुजबळ यांनी लगावला.

 

शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असतो. आणि शिवसेनेत ज्यांनी सर्वात जास्त राजकीय पद मिळवली त्यासाठी त्यांनी अनेकांना डावललं एवढंच नाही स्वता:चा भाचा सुधीर जोशी याला सुद्धा डावलून पद मिळवणारे जोशी यांना व्यासपीठावरुन अशा रितीने जावं लागलं हा नियतीने उगवलेला सूड आहे अशी मार्मिक टीका भुजबळ यांनी केली. तसंच मनोहर जोशी हे काही लोकांमध्ये लोकप्रिय असे नेते नाही. किंवा शिवसैनिकांमध्ये ते प्रिय आहे असंही काही नाही. त्यांच्यापेक्षा भाषणामध्ये वामनाराव महाडिक, दत्ताजी साळवे असे अनेक नेते होते. त्याकाळी या सगळ्या नेत्यांचा दरारा होता. लोकांचा भक्कम पाठिंबा होता. पण मनोहर जोशी यांनी चाणक्य नितीने म्हणा की, आपल्या डावपेचांमुळे त्यांनी सगळ्यांना बाजू केलं असा आरोपही त्यांनी केला.

close