राज्यसभेची जागा हवी होती म्हणून सरांचा राडा?

October 15, 2013 10:55 PM0 commentsViews: 3289

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई

 

15 ऑक्टोबर : मनोहर जोशी कुठे गेले, याची आज राज्यभर चर्चा रंगली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर आता ते 36 तासांपासून अनरिचेबल झालेत. पण मुळातच जोशी सरांना राज्यसभेची जागा हवी होती, अशी माहिती आता पुढे येतेय.
मनोहर जोशी… एके काळी सेनेमुळे राज्याच्या सर्वोच्च पदी बसलेली नेता..आता मात्र शिवसेना नेतृत्वाच्या आणि शिवसैनिकांच्या मनातून पुरता उतरलाय. उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना शिवाजी पार्कच्या सभेतून अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवला. दुसर्‍या दिवशी सकाळी ते घरातून निघाले आणि त्यानंतर अनरिचेबल झाले.
दक्षिण मध्य मुंबईचं लोकसभेचं तिकीट मिळत नाही, म्हणून अस्वस्थ झालेल्या जोशी सरांनी नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. निदान राज्यसभेच्या जागेवर वर्णी लागेल, अशी जोशी सरांना आशा होती. राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक होतेय. पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी धुत आणि राऊत यांनी पक्षाला विनंती केलीय. पण पक्षाला केवळ एकालाच उमेदवारी देता येणार आहे. एका उमेदवाराची भिस्त इतर पक्षाच्या उर्वरीत मतांवर असेल.
या निवडणुकीची जुळवाजुळव करताना जोशी सरांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. पण ही चर्चा करताना पक्षप्रमुखांना अंधारात ठेवल्यामुळे ते नाराज आहेत. मनोहर जोशींवर शिवसेनेचं नेतृत्व नाराज आहे, हे कळताच शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांना आनंद झालाय. जोशी सरांना आता शिवसेनेकडून लोकसभा किंवा राज्यसभा मिळण्याची शक्यता मावळलीये. अशात अनरिचेबल झालेले माजी मुख्यमंत्री काय करतात, याबद्दल शिवसैनिकांमध्ये चर्चा रंगलीये.

close