सलीम कुत्ताला मिळतोय सरकारी पाहुणचार

February 5, 2009 8:09 AM0 commentsViews: 3

5 फेब्रुवारी, औरंगाबाद संजय वरकडमुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही गृहखात्याला अजून जाग आलेली नाहीये. याचं एक उदाहरण पाहायला मिळतंय ते औरंगाबादमध्ये. 93च्या बॉम्बस्फोटातला आरोपी आणि एक खतरनाक गँगस्टर सलीम कुत्ता याला अगदी पाहुणचार करत पोलीस दर महिन्याला मुंबईला सुनावणीसाठी घेऊन गेलं जातं. मुंबई आणि देशाला हादरवणारा 93चा बॉम्बस्फोट. या बॉम्बस्फोटातला एक आरोपी आहे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीमोद्दीन उर्फ सलीम कुत्ता. दिघी बंदरात स्फोटकं उतरवण्यात त्याचा सहभाग होता. याच गुन्ह्यात त्याला जन्मठेप झालीय. हा सलीम कुत्ता सध्या औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये शिक्षा भोगतोय. त्याला सुनावणीसाठी दर महिन्याला मुंबईला नेलं जातं. गेल्या वर्षभरात सलीमच्या 23हून अधिक मुंबईवार्‍या झाल्यात. मुंबईला जाताना सलीमसोबत एक पीएसआय आणि अकरा पोलीस शिपाई असतात. पण प्रत्येक वेळी हेच पोलीसपथक सलीमसोबत जात असल्याचं वरिष्ठांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळं आता सलीमसोबत दरवेळी वेगळे पोलीस पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. पण गेले वर्षभर सुरू असणार्‍या या प्रकारामुळं गृहखात्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेल्याची अनेक उदाहरणं समोर असतानाही राज्याच्या गृहखात्यानं आपलं धोरण बदललं नाही. त्यामुळं पोलिसांना दरवेळी मोठी जोखीम उचलावी लागते. खरं तर अशा आरोपींसाठी जेलमध्येच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची व्यवस्था करता येऊ शकते. त्यातून आरोपीच्या सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसंच आरोपीला नेण्या-आणण्याच्या खर्चातही बचत होईल. पण या मुद्दयांकडं दुर्लक्ष केलं जातंय. अशा आरोपींसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी करता नेलं पाहिजे, " असं मत वकील अभय टाकसाळ यांचं आहे. राज्यातल्या पोलीस यंत्रणेला सलीमसारखे शेकडो गुंड सांभाळण्याची कसरत करावी लागते. त्यामुळं गृहखात्याच्या या कारभाराला पोलीसही वैतागलेत.

close