शरद पवारांची नवी इनिंग !

October 18, 2013 10:39 PM0 commentsViews: 884

स्मिता नायर, मुंबई
18 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार क्रिकेट व्यवस्थापनामध्ये परतलेत. त्यांनी यापूर्वी 10 वर्षे एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज फेटाळल्यामुळे पवार आता बिनविरोध एमसीएचे अध्यक्ष म्हणून निवडून येणार हे निश्चित.

 
72 वर्षांचे शरद पवार बीसीसीआयमध्ये परतल्यानंतर बोर्डाच्या अनेक पदाधिकारांच्या पोटात खड्डा पडणार आहे. बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन… हे पवारांच्या महत्त्वाच्या विरोधकांपैकी एक आहेत. सध्या त्यांची बीसीसीआयवर मजबूत पकड आहे. आणि पवारच त्यांना धक्का देऊ शकतात, असं मानलं जातं. हे पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्यच मानलं जातं. एमसीएचे निवडणूक अधिकारी एस. एम. गोरवडकर यांच्या या पत्रामुळेच मुंडे स्पर्धेतून बाद झाले आणि पवारांचा मार्ग मोकळा झाला. मुख्य म्हणजे एमसीएचे अध्यक्ष म्हणून आता ते बीसीसीआयच्या कामकाजात भाग घेऊ शकणार आहेत.

 
आयपीएलमुळे पुढे आलेल्या ललित मोदी यांचं बीसीसीआयमध्ये वर्चस्व श्रीनिवासन आणि पवार यांच्यातले मतभेद वाढण्यास कारणीभूत ठरलं. त्यावरून बीसीसीआयमध्येही दोन गट पडले. आज घडीला तरी श्रीनिवासन यांची बीसीसीआयवर घट्ट पकड आहे. पणशरद पवार त्यांना बाजूला करण्यास उत्सुक आहेत.

 
दुसरीकडे, पवार यांना फक्त गोपीनाथ मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. तेही मुंबईचे रहिवासी नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांचा अर्ज बाद झालाय. पण मुंडेंनी अजून तरी हार मानलेली नाही.
आयपीएलमधल्या बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंगच्या वादानंतर एन. श्रीनिवासन यांना थोडासा धक्का बसला, तरी त्यांची बोर्डावर मजबूत पकड आहे. शरद पवार यांनी त्यांना आव्हान दिलं, तर येत्या काही महिन्यांमध्ये श्रीनिवासनविरोधी घडामोडींना वेग येऊ शकतो.

 
शरद पवार यांनी 2001 पासून क्रिकेट व्यवस्थापनात प्रवेश केला. आधी एमसीए, मग बीसीसीआय आणि नंतर आयसीसी अशी चढत्या क्रमाने त्यांनी क्रिकेटची सत्ता अनुभवली. आता ते पुन्हा एमसीएचे अध्यक्ष म्हणून क्रिकेटच्या रिंगणात आलेत. त्यांच्या या दुसर्‍या इनिंग्जकडे तितक्याच उत्सुकतेनं पाहिलं जातंय.

close