फिल्म रिव्ह्यु : जादुई संहिता !

October 18, 2013 11:14 PM0 commentsViews: 1051

अमोल परचुरे, समीक्षक

फेस्टीव्हल सिनेमा, व्यावसायिक सिनेमा, कलासक्त सिनेमा अशी तुलना करत नसाल, पडद्यावर जे दिसतंय ते मनाला भिडणं महत्त्वाचं असं मानत असाल तर तुम्ही ‘संहिता’ आवर्जून बघायला पाहिजे. खूप अनोखा, आनंददायी असा सिनेमा बघण्याचा अनुभव सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिलेला आहे. स्त्रीचं जगणं, मग ते स्वातंत्र्यपूर्व काळातलं असो किंवा अगदी आत्तच्या आधुनिक युगातलं असो, या जगण्यातले अनेक पदर संहिता सिनेमात उलगडून दाखवलेले आहेत. संहितर सिनेमाची संहिताच जादुई आहे, म्हणजे हा सिनेमा एकदा पाहिला की जे आपल्याला सापडेल त्यापेक्षाही काहीतरी वेगळं, गर्भित हे दुसर्‍यांदा पाहताना सापडून जाईल. दोन पूर्णपणे भिन्न काळ, त्यांची गुंफण, त्यातल्या व्यक्तिरेखांचा स्वत:शी आणि परिस्थितीशी चाललेा झगडा, तेव्हाही आणि आताही असा एकात एक अतिशय सुंदर मिसळून गेलाय.

 
काय आहे स्टोरी ?
संहिता ही कथा रेवती साठे या डॉक्युमेंटरी मेकरची आहे, अतिशय गाजलेल्या सिनेमांच्या निर्मात्याची पत्नी शिरीनचा आहे, लोकप्रिय अभिनेत्री हेमांगिनीची आहे आणि प्रथितयश लेखिका तारा देऊसकर यांचीही आहे. रेवती साठेला शिरीन भेटायला बोलावते आणि सिनेमा बनवण्याची ऑफर देते. कथा शिरीनने खूप पूर्वी वाचलीये पण आता पुस्तक तिच्याकडे नाही. कथा लिहिलेली आहे तारा देऊसकर यांनी. मग रेवती तारा देऊसकरना भेटते, तारा देऊसकर रेवतीला कथा जिथं घडलेली असते त्या सत्यशील पॅलेसमध्ये घेऊन जातात. एक राजा, एक राणी आणि दरबारी गायिका भैरवी यांच्यातल्या प्रेमाच्या त्रिकोणाची गोष्ट, पण या त्रिकोणाकडे प्रत्येकजण वेगळ्या कोनातून बघतोय.

Samhita film review

शिरनला ही समर्पणाची गोष्ट वाटतेय तर तारा देऊसकरना शोषणाची. भैरवीच्या भूमिकेसाठी हेमांगिनीची निवड होते. सगळ्यांचं सगळं म्हणणं लक्षात घेऊन रेवती संहिता लिहायला घेते आणि तो काळ तिच्यासमोर उभा राहतो. ती लिहीत जाते, पण शेवट काय करायचा यावर अडखळते. बरं, रेवती, शिरीन, तारा आणि हेमांगिनी या चारचौघींच्या सध्याच्या आयुष्यातही बरीच बेचैनी असते. म्हणजेच एकावेळी दोन ट्रॅकवर सिनेमा सुरु असतो, पण समांतरपणे नाही तर संहितेत मिसळून गेल्याने त्यांच्यात एकरुपता जाणवत राहते. सिनेमाची नायिका रेवती आणि सिनेमात संहिता लिहिणारी लेखिकसुद्धा रेवतीच त्यामुळे तिच्या तंत्राने, तिच्या दृष्टीतून सिनेमाचा प्रवास दिसत राहतो. खूपच गुंतवून, गुंगवून टाकणारा अनुभव संहितामधून मिळतो.

 

 

परफॉर्मन्स
जे कथेचं तेच अभिनयाचं, तेच संगीताचं, तेच वेषभूषेचं, सगळ्या आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी झालेली आहे. ज्योती सुभाष, राजेश्वरी, मिलिंद सोमण, उत्तरा बावकर, डॉ.शरद भुताडिया सर्वच कलाकारांनी दोन भूमिका सादर करताना खरंच कमाल केलेली आहे, पण यातही देविका दफ्तरदार हिने रेवती साठे आणि मालविका राणी अशा दोन भूमिका ज्या विलक्षण पद्धतीने साकारल्यात ते बघून तिच्या बुध्दीमान अभिनयाची साक्ष पटते. सिनेमाचं संगीत हे स्वर्गीय आहे. दरबारी संगीत असो किंवा शेवटी ‘भेटी लागी जीवा’चा आर्तपणा असेल, अगदी त्या संगीतात हरवून जायला होतं. शैलेंद्र बर्वेनं तर संगीतकार म्हणून सिक्सरच मारलीये असंच म्हणावं लागेल.

 

Samhita film review 3
नवीन काय ?
अर्थात, शैलेंद्रचं संगीत झळाळून गेलंय ते आरती अंकलीकर यांच्या स्वरांमुळे.आरती अंकलीकर यांची स्वरांची जादू आणि राजेश्वरीने सिनेमात गाणी गाताना, आलाप घेताना जो अप्रतिम अभिनय केलाय त्यामुळेच सिनेमाच्या एकूण प्रभावात खूपच भर पडलीये. सिनेमात दाखवलेला राजवाडा आहे कोल्हापूरचा शालिनी पॅलेस.. आजपर्यंत अनेक मराठी सिनेमात दिसलेला हा पॅलेस इतका वैभवशाली आहे, भव्य आहे आणि त्याचं रुपडं इतकं राजबिंडं आहे हे पहिल्यांदाच या सिनेमातून जाणवलं. 40 ते 50 च्या दशकातला राजेशाही थाट, त्याकाळातील वेषभूषा, गाड्या हेसुध्दा खूपच अभ्यासपूर्वक उभं केल्याचं जाणवतं. काही ठिकाणी थोडासा लांबलाय असं वाटत असलं तरी संहिता ही एक दर्जेदार कलाकृती नक्कीच आहे. कुणाला हा स्त्री-प्रधान सिनेमा वाटेल, पण खरंतर प्रत्येकालाच स्त्रीबरोबरच्या नात्याचा नव्याने विचार करायला लावेल इतका हा महत्त्वाचा सिनेमा आहे.
रेटिंग : संहिता – 75

close