पुण्याच्या महापौरांकडे विकास निधीच नाही !

October 21, 2013 9:08 PM0 commentsViews: 543

pune muncipal corporation21 ऑक्टोबर : महापौर हा खरं तर शहराचा पहिला नागरिक..पण शहराचा विकास करण्यासाठी त्याच्याकडे निधीच नसेल तर? हो, हे घडतंय फार कुठे लांब नाही, तर पुण्यात. आधीच्या महापौरांनी अवघ्या पाच महिन्यांमध्ये वर्षभराचा 5 कोटी रुपयाचा निधी खर्च केल्यामुळे विद्यमान महापौर चंचला कोद्रे यांच्याकडे महापौर विकास निधीच उरला नाहीय.

 
पुणे महापालिकेच्या महापौरांना खर्च करायला निधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात हे काही महापालिका आर्थिक अडचणींमध्ये असल्यामुळे नाही, तर हे झालंय आधीच्या महापौरांनी अवघ्या पाच महिन्यांमध्ये वर्षभराचा निधी खर्च केल्यामुळे. शहर विकासासाठीची वेगवेगळी कामं करण्यासाठी दरवर्षी महापौर विकास निधीची तरतूद करण्यात येते. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या निधीतून विकासकामं करण्याची तरतूद केली जाते.

 

यंदाच्या वर्षी बजेटमध्ये यासाठी जवळपास 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा संपुर्ण निधी अवघ्या पाच महिन्यांमध्येच खर्च झाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणांप्रमाणे महापौर पदाचं वाटप सव्वा सव्वा वर्षांच्या कालावधी साठी करण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाच्या महापौर बदलणार होते. महापौर पदाची निवडणूक होण्यापूर्वी पुर्वीच्या महापौर वैशाली बनकर यांना जवळपास 5 महिन्यांचा कालावधी मिळाला.

 

त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विकासकामांसाठी महापौर विकास निधी खर्च केल्यामुळे नव्या महापौरांना निधीच उपलब्ध नाही अशी परिस्थीती निर्माण झाली. नव्या महापौर चंचला कोद्रे यांना पुढच्या 7 महिन्यांसाठी निधी कुठुन आणायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्गीकरणातून महापौर निधीसाठी तरतूद करावी यासाठी स्थायी समितीकडे अर्ज करणार असून त्यामध्ये जर हा निधी मंजूर झाला तर निधी उपलब्ध होऊ शकेल असं कोद्रे यांनी सांगितलं.

close