बार्शीमध्ये अजूनही हातानं मैला उचलण्याची प्रथा सुरूच

October 22, 2013 3:57 PM0 commentsViews: 736

mailla 4422 ऑक्टोबर : देशात आघाडीचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात समाजाला धक्का देणार्‍या घटना सतत घडत असतात. मग ती जातपंचायतीची असो की दलित वस्तीवरच्या बहिष्काराची असो… सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये मेहतर समाजातल्या कामगारांना अजूनही हातानं मैला उचलावा आणि वाहून न्यावा लागत आहे, अशी धक्कादायक बाब उघड झालीये.

 

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाबद्दल शंका येणार्‍या घटना सध्या राज्यात वारंवार घडतायेत. यातल्या कित्येक घटनांनी तर माणुसकीला काळिमा फासला जातोय. सोलापुरातल्या बार्शीत सुरू असलेल्या प्रकारानं तर पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍यांचे डोळे लख्ख उघडले जातील. कारण बार्शीमध्ये आजही हातानं मैला उचलला जातोय. परंपरेनं मेहतर समाजातील लोक हा मैला उचलण्याचं काम करतायेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा मैला हे लोक हातानं उचलून वाहून नेत आहे.

 
बिस्मिल्ला कासम शेख…गेल्या 22 वर्षांपासून ही महिला बार्शीतल्या रस्त्यावरचा मैला उचलण्याचं काम करते. आता हे काम कुणीच करत नाही, याची तिला कल्पनाही नाही. हातानं मैला उचलण्याच्या या अमानवी प्रथेवर संसदेनं कायदा करून नुकतीच बंदी आणलीये. पण याची अंमलबजावणी तर दूरच…पण हा आपल्यावरचा अन्याय आहे,याची जाणीवही या कामगारांना नाहीये.

 
राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल हे बार्शीचे लोकप्रतिनिधी..बार्शी नगरपालिकेवरही त्यांचंच वर्चस्व आहे. सुमीत एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेडला बार्शीच्या स्वच्छतेचा ठेका देण्यात आलाय. त्यांना त्यासाठी महिन्याला 30 लाख रूपये दिले जातात. पण कामागारांना हातानं मैला उचलावा लागतोय याचा त्यांना थांगपत्ताच नाहीय.
काही महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातली ही प्रथा बंद करण्याचे आदेश दिले होते.बार्शीत सार्वजनिक शौचालयांची संख्या अत्यंत कमी आहे आणि जी आहेत ती ब्रिटीशकालीन शौचालयं आहेत. त्यांची तर स्वच्छता कशी करावी असा प्रश्न सफाई कामगारांना पडतो. पण प्रशासनाला त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही.

 
आपल्याला रस्ते, शहर स्वच्छ हवंय, पण ते स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कुणाच्या तरी जीवाशी खेळतोय,याची साधी जाणीवही आपल्याला नाहीये आणि जोपर्यंत ती होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र पुरोगामी आहे असा दावा आपण करू शकत नाही. मैला वाहून नेण्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. त्यानंतर केंद्र सरकारनं 1993 मध्ये हा कायदा बनवला. 18 सप्टेंबर 2013 ला नवीन सुधारित कायदा संसदेनं मंजूर केला. पाहूया हा कायदा काय म्हणतो.

=================================================================
मैला वाहण्यावर बंदी कायदा (18 सप्टें. 2013)
कुणाचा समावेश
मैला उचलणारी व्यक्ती याचा अर्थ मानवी विष्ठा हाताने स्वच्छ करणे, वाहतूक करणे, मैला नष्ट करणे किंवा कोणत्याही प्रकारे हाताने
 मैला उचलणे, उघड्या जागेवरचा किंवा शौचालयातला मैला संपूर्णपणे विघटन होण्यापूर्वी उचलणे याचा समावेश होतो.

=================================================================
कायद्यातल्या तरतुदी
- मानवी मैला हाताळणार्‍या व्यक्ती आढळल्या तर संबंधित प्रशासनाने अशा ठिकाणी सर्वेक्षण करून अशा व्यक्तींची नोंद करावी
- दोन महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण करावं
- प्रशासनातले मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वेक्षणासाठी जबाबदार राहील

=================================================================
मानवी मैला वाहणार्‍या व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत कायदा काय म्हणतो
- अशा व्यक्तीला ओळखपत्र देऊन तिच्यावर अवलंबून असणार्‍या कुटुंबातल्या सर्वांची नोंद करावी
- अशा व्यक्तींच्या पाल्यांना केंद्र किंवा राज्याच्या योजनांतर्गत शिष्यवृत्ती द्यावी
- अशी व्यक्ती किंवा तिच्या घरातल्या एका सज्ञान व्यक्तीला त्याची अर्हता आणि इच्छेनुसार आवश्यक शिक्षण दिलं जावं
- या प्रशिक्षण काळात त्याला स्टायपेंड दिलं जावं आणि हे स्टायपंड 3 हजार रुपयांपेक्षा कमी असू नये
- अशा व्यक्तीनं किंवा त्याच्या एखाद्या सज्ञान कुटुंबीयानं एखादा व्यवसाय करण्याची इच्छा दाखवली तर त्याला अनुदान किंवा कर्ज देण्यात यावं

=================================================================
कायदा पाळला नाही तर काय शिक्षा होऊ शकते
- हा कायदा न पाळणार्‍याला एक वर्ष कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते
- शिक्षा होऊनही एखाद्याने पुन्हा कायद्याचा भंग केला तर दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा पाच लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते

close