लिटील चॅम्पचा विजेता प्रथमेशच – रत्नागिरीकरांची तीव्र इच्छा

February 5, 2009 11:40 AM0 commentsViews: 6

5 फेब्रुवारी, रत्नागिरी दिनेश केळुसकर आयडीया सारेगम लिटील चॅम्पची अंतिम फेरी रविवारी होतेय. कोकणातल्या आरवली गावातला प्रथमेश लघाटे यात विनर होईल अशी आशा त्याच्या वर्गमित्रांना आणि कुटुंबीयांना वाटतेय. लिटील चॅम्पसच्या महांतिम फेरीत पोहोचलेल्या प्रथमेश लघाटेच्या घरात 1929 सालापासून भजनी परंपरा चालत आलेली आहे. काकांनी घरात तंबोरा आणला त्यावर्षी प्रथमेशचा जन्म झाला. " त्या वर्षी तो हा तंबोरा वाजवल्याशिवाय झोपायचाच नाही, " प्रथमेशचे काका गहिवरून सांगत होते. महाअंतिम फेरित पोहोचलेला प्रथमेश महागायकच होणार अशी खात्री त्याच्या निकटवर्तियाना आहे. " माझं तर असं म्हणणं आहे की लोकांनी पूर्ण स्पर्धेचा विचार करून एसेमेस करावेत. असं जर केलं तर मला वाटत नाही की प्रथमेशला कोणी रोखू शकेल, " असं मत प्रथमेशचे नातेवाईक राजा केळकर यांनी व्यक्त केलं. प्रथमेशच्या आईचा मात्र काही अट्टाहास नाही. " माझा प्रथमेश उत्तम गायक आहे. तो नाही जिंकला तरी माझ्यासाठी तो खरा विजेता आहे, " असं प्रथमेशची आई म्हणाली. पण प्रथमेशची शाळा मात्र त्याच्यासाठी खूप मेहनत घेतेय. विशेष म्हणजे त्याच्या 9 वीच्या वर्गाची कॉलर जास्तच ताठ आहे. " प्रत्येक विद्यार्थ्याने घरोघरी फिरून एसेमेस करा असं आवाहन लोकांना केलेलं आहे.आणि या आवाहनाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे, " असं माखजन हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं. " मला वाटतं की प्रथमेश आता जिंकायला हवा. कारण तो त्याच्या गाण्याच्या कौशल्याने पुढे आलेला आहे , " अशी प्रथमेशच्या वर्गमित्रांची इच्छा आहे. प्रथमेशला आर्या आंबेकरचीच फाईट आहे असं वाटतंय. प्रथमेशला एसेमेस कमी पडू नयेत म्हणून त्याची शाळा आणि चिपळूणातल्या काही संस्था विशेष मेहनत घेतायत. आता सर्वांचे डोळे लागलेयत ते रविवारकडे.

close