राज्यसभेसाठी सेनेचा आठवलेंना पाठिंबा, जोशींना शह !

October 23, 2013 3:25 PM0 commentsViews: 3008

athavale and joshi_new23 ऑक्टोबर : राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेनं एक नवी खेळी खेळलीये. राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना शिवसेनेनं बळ दिलंय. आठवलेंना पाठिंबा देऊन शिवसेनेचे ज्येष्ठ आणि सध्या नाराज असलेले नेते मनोहर जोशी यांना एक प्रकारे शह दिलाय.

 

याबाबत मिलिंद नार्वेकर आणि रामदास आठवले यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार नार्वेकरांनी आठवलेंना आश्वासन दिल्याचं कळतंय. दोन दिवसांपूर्वी ही चर्चा झाल्याचं समजतंय. शिवसेना-भाजपसह इतर पक्षांची मतंही आठवलेंना मिळावीत यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

 
राज्यसभेच्या 7 जागांसाठीच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत 37 मतं मिळवणारा उमेदवार विजयी होईल. सध्या विधानसभेत काँग्रेसचे 82 उमेदवार आहेत. तर 12 अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. काँग्रेसनं जरी 40 मतांचा कोटा उमेदवारीसाठी ठेवला तर या मतांच्या बळावर काँग्रेसचे 2 उमेदवार सहज निवडून येतील. आणि 14 मतं शिल्लक राहतील. तर राष्ट्रवादीकडे स्वतःचे 62 आणि अपक्ष 11 अशी एकूण 73 मतं आहेत. त्यामुळे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला एका मताची आवश्यकता आहे.

 

अशावेळी राष्ट्रवादीला 2 उमेदवार निवडणूक आणण्यासाठी काँग्रेस मदत करेल. शिवसेनेच्या 46 मतांमधून एक उमेदवार सहज निवडून येईल. आणि त्याची 9 मतं शिल्लक राहतील. तर भाजपकडे 47 मतं असल्यानं त्यांचाही एक उमेदवार निवडून येईल आणि 10 मतं शिल्लक राहतील. असे सहा उमेदवार निवडून आल्यानंतर सातव्या जागेवर मनोहर जोशींचा डोळा आहे. त्यासाठी युतीच्या 19 मतांसोबतच मनसेच्या 10 मतांची मदत घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

 

त्यासाठी पवार मदत करतील, अशीही त्यांना अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेटही घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते त्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी दसर्‍या मेळाव्यात घरचा रस्ता दाखवून दिला. त्यामुळे सेना नेतृत्व जोशींवर नाराज असल्यानं त्यांच्या प्रयत्नांना कितपत साथ मिळेल याबाबत शंकाच आहे. आता तर शिवसेनेनं जोशींना डावलून आठवलेंना पुढं केल्यामुळे जोशींचा पाय आणखी खोलात गेलाय.

असं आहे राज्यसभेचं गणित

  • - पहिल्या फेरीत 37 मतं मिळवणारा उमेदवार विजयी होईल
  • - विधानसभेत काँग्रेसचे 82 उमेदवार, 12 अपक्षांचा पाठिंबा
  • - 40 मतांच्या कोट्यावर काँग्रेसला 2 उमेदवार निवडून आणणं शक्य
  • - काँग्रेसची 14 मतं शिल्लक राहतील
  • - राष्ट्रवादीकडे स्वतःचे 62, अपक्ष 11 अशी एकूण 73 मतं
  • - राष्ट्रवादीला 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस मदत करेल
  • - सेनेकडे 46 मतं, 1 उमेदवार निवडून आणणं शक्य, 9 मतं शिल्लक
  • - भाजपकडे 47 मतं, 1 उमेदवार निवडून आणणं शक्य, 10 मतं शिल्लक

 

close