‘बिंग शरद पवार’, पवारांची आता ब्लॉगर इनिंग

October 23, 2013 9:12 PM0 commentsViews: 728

pawar blog new23 ऑक्टोबर : राजकारण,समाजकारण,अर्थकारण ते अगदी क्रिकेटच्या मैदानापर्यंत सगळीकडे ज्यांचं नाव आदरांनं घेतलं जातं ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. आता शरद पवार यांची नवीन इनिंग सुरू झाली ती ब्लॉगर म्हणून.. तब्बल 45 वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर शरद पवार यांनी आता स्वत:चा एक ब्लॉग सुरु केलाय. ‘बिंग शरद पवार’ ‘being sharad pawar‘ या नावानं हा ब्लॉग सुरु करण्यात आलाय.

 

या ब्लॉगवर पवार आपले अनुभव आणि विचार मांडणार आहेत. पवार यांनी कृषी या विषयावर हा ब्लॉग लिहिलाय. या ब्लॉगमध्ये पवार यांनी कृषीमंत्री म्हणून आपल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडलाय. या ब्लॉगची अधिकृत घोषणा 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे पण आजच त्यांनी आपल्या ब्लॉगवर विचार अन्नाचा भाग 1 ( फूड फॉर थॉट -1) या विषयाने ब्लॉगचा श्रीगणेशा केलाय. या अगोदरही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी आदी नेते ब्लॉगर म्हणून नेटकर्‍यांच्या भेटीला आले आहे. आता शरद पवारही या ब्लॉगरच्या भूमिकेतून आपले विचार मांडणार आहे.

 
राष्ट्रवादी फेसबुक, ट्विटरवर

दरम्यान, सोशल मीडिया आणि वेबसाईटचं महत्त्व लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता वेबसाईट आणि फेसबुक, ट्विटरवर अकाउंट सुरु केलंय. राष्ट्रवादीची सुधारित वेबसाईट आणि मोबाईल ऍप्सचं अनावरण आज मुंबईत राष्ट्रवादी भवनात करण्यात आलं. यासोबतच फेसबुक आणि ट्विटरचे पेजेसचही आज अनावरण झालं. या माध्यमांच्या मार्फत पक्षाने घेतलेले निर्णय, राबवलेल्या योजना आणि पक्षातल्या महत्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्याचा पक्षाचा मानस आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित होते.

 

पवारांच्या ब्लॉगची लिंक http://www.beingsharadpawar.com/

close