कांदा पुराणाला राजकारणाचा वास !

October 23, 2013 11:03 PM0 commentsViews: 463

23 ऑक्टोबर : पुन्हा एकदा कांद्याच्या किमतीने राजधानीत धुमाकूळ घातलाय. साठेबाजीमुळे कांद्याच्या किमती वाढल्याचं दिल्लीकरांचं म्हणणं आहे. पण जिथे कांदा पिकतो त्या नाशिकमधली वस्तुस्थिती एकदम वेगळी आहे. कांदा पिकलाच नाही तर साठवणार काय, असा प्रश्न नाशिकमधील शेतकरी विचारत आहेत. त्यामुळे या कांदा पुराणाला वेगळ्या राजकारणाचाही वास येऊ लागलाय.
कांद्याच्या चढ्या भावानं राजधानी दिल्लीतलं वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. नेहमीप्रमाणे साठेबाजीमुळे कांद्याच्या किमती वाढल्याचं अन्न आणि पुरवठा मंत्रालयातून भाकीत झालं, तर निर्यातबंदी लादण्याचं हत्यार वाणिज्य मंत्रालयानं उपसलं.

 

वाणिज्य मंत्री आनंद शर्मा म्हणतात, कांद्याचा साठा करून कृत्रिम कमतरता निर्माण करून दरवाढ करणार्‍या साठेबाजांविरोधात राज्य सरकारांनी कठोर पावलं उचलली पाहिजे.
प्रत्यक्षात नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या कमी पावसामुळे कांद्याच्या पिकात 50 टक्क्यांनी घट झालीए.

 

राज्यातील कांदा लागवडीतील घट

  • 2011 -12 – 67 हजार हेक्टर
  • 2012-13 – 37 हजार हेक्टर

नवीन पीक येणार होतं, मात्र नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाचा फटका त्यालाही बसलाय. कांदा उत्पादक पट्‌ट्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडला. सुदैवानं यावर्षी चांगला पाऊस झाला. पण, अतिवृष्टीमुळे जो स्टॉक होता आणि जे पीक होतं ते खराब झालं अशी माहिती शरद पवार यांनी दिली. त्यामुळे कांदा ना शेतकर्‍याच्या मळ्यात आहे ना व्यापार्‍याच्या खळ्यात..
अर्थात कांद्याच्या होलसेल आणि रिटेल बाजारातली तफावत प्रचंड आहे. होलसेल बाजारात 50 रुपयांचा कांदा किरकोळ बाजारात दामदुपटीनं विकला जातोय हीच यातली खरी मेख आहे. बाजारात कांदा महाग असला तरी राजकारणासाठी मात्र तो खूपच स्वस्त आहे. कदाचित, दिल्लीची निवडणूक हेच कांद्याच्या या अर्थकारणामागचं राजकारण असू शकतं.

close