ट्रॅव्हल्सवाल्यांची मनमानी, नाशिककर वेठीस !

October 24, 2013 5:39 PM0 commentsViews: 248

दीप्ती राऊत, नाशिक
24 ऑक्टोबर : खाजगी प्रवासी वाहतूक ऐन सणांच्या काळात नागरिकांची मजबुरी बनते. अडलेल्या प्रवाशाला चढ्या दरानं तिकीटं घ्यावी लागतात.आणि पुढे वर्षभर तेच चढे दर ठेवले जातात. नाशिकमधल्या ग्राहक संघटना या प्रश्नाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतायत. पण शासकीय उदासीनतेमुळे त्यांच्या पदरी काहीही पडलं नाहीये.

 
नाशिक मधून पुणे-मुंबई-औरंगाबाद ही शहरं असोत किंवा इंदौर-भोपाळ, सुरत ही इतर राज्यातली ठिकाणं असोत, बहुतेक प्रवाशांचे पाय खाजगी गाड्यांकडे वळतात कारण महामंडळाच्या गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांमध्ये जास्त सुविधा दिल्या जातात हे त्यामागचं प्रवाशांचं एकमेव स्पष्टीकरण. पण त्याबदल्यात त्यांना मोजाव्या लागतात अवाच्या सव्वा पैसे.

 
नाशिकमध्ये दरवर्षी हा प्रश्न उपस्थित होतो. ग्राहक संघटना शासनाला पत्र लिहिते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. आता उदाहरण म्हणून नाशिक – पुणे हा रुटच बघाना,या मार्गावर सणासुदीच्या काळात मोठी प्रवासी वाहतूक होत असते. मग ते गौरी गणपती असोत किंवा दिवाळी. नाशिककरांना पुण्याचा सुखद प्रवास करायचा असेल तर दर वर्षी 100 रुपये जास्त मोजावे लागत आहेत.

गेल्या 4 वर्षातली नाशिक -पुणे मार्गावरच्या खाजगी गाड्यांचे दर वाढ

 

  • 2010 – 300 रुपये
  • 2011 – 400 रुपये
  • 2012 – 500 रुपये
  • 2013 – 600 रुपये

यंदाची दिवाळीही याला अपवाद नाही आहे. यंदा नेहमीचे दरांपेक्षा 100 रुपये वाढ केली आहेत. नाशिकहुन खाजगी बस मधून मुंबईत जाण्यासाठी 500 रुपये मोजावे लागणार आहेत, तर पुण्याला जाण्यासाठी प्रत्येकी 600 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

  • नाशिक – पुणे – नेहमीचे दर – 500 रुपये – दिवाळीतील दर – 600 रुपये
  • नाशिक – मुंबई – नेहमीचे दर – 400 रुपये – दिवाळीतील दर – 500 रुपये

सणांच्या दिवसात प्रवाशांची होणारी ही पिळवणूक का थांबत नाहीए आणि याचं उत्तरही सोपं आहे. शासनकर्त्यांची तशी मानसिकता नाही आहे. इच्छाशक्तीचा आभाव. खाजगी प्रवासी वाहतुकीचं नियंत्रण करणं ही शासनाची जबाबदारी आहे, तशी तरतुदही आहे, वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, राज्य पातळीवर परिवाहन आयुक्त आहेत, परिवाहन मंत्र्यांच्या अखत्यारित हा अधिकार आहे, विभागीय वाहतूक समित्या आहेत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदा आहेत पण तरीही शासन रिक्षा, ट्रक्सी या खाजगी वाहतुकीचे दर ठरवते मग हे का नाही !

 
कारण मुद्दा आहे अंमलबजावणीचा. नाशिकच्या मुंबई नाक्यावर टपर्‍या टाकून सुरू असलेली ही प्रायव्हेट ट्रॅव्हल्सची दुकानं अनधिकृत, रस्त्यावर होणारं पार्किंग अनधिकृत आणि ट्रॅफीक मात्र 24 तास कायमचं आहेत. सगळ्यांना सगळ्याचे वाटे मिळतात. असंघटीत आणि नडलेला प्रवासी मात्र वार्‍यावरच राहतात.
 

close