पुण्यात आर्याच्या विजयासाठी जोरदार प्रचार

February 5, 2009 3:25 PM0 commentsViews: 127

5 फेब्रुवारी, पुणे प्राची कुलकर्णी सारेगमप लिटील चॅम्पसची अंतीम फेरी 8 फेब्रुवारीला होणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या या सगळ्याच लिटिल चॅम्पना विजेतं ठरवण्यात यावं असं रसिकांना वाटतंय.असं असलं तरी अंतिम फेरीसाठी प्रत्येकजण तयारी करतोय. पुण्याची प्रीटी यंग गर्ल आर्या आंबेकर विजेती ठरावी यासाठी सगळे पुणेकर तयारीला लागलेत. पुण्यातल्या टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूलची आर्या आंबेकर विद्यार्थिनी आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेतले नववीचे विद्यार्थी पोस्टर्स बनवण्यात सध्या बिझी आहेत. त्यांची क्लासमेट आर्या जिंकावी, यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. आर्याच्या शाळेतले शिक्षक आणि तिचे मित्र मैत्रिणी सगळे तिला चिअर करायला मुंबईला जाणारेत. आर्याच जिंकणार अशी त्यांना खात्री आहे. " मी माझ्या सोसायटीत आर्याच्या नावाचे बॅनर्स लावले आहेत. शिवाय माझ्या सगळ्या फॅमिली आणि रिलेटिव्हजनाही आर्याला वोट करा असंच सांगितलंय, " आर्याची बेस्ट फ्रेंड रमा साठे आनंदानं सांगत होती. " आमच्या आर्याला सगळ्यांनी जिंकवावं या अर्थाचे फ्लेक्स आम्ही पुण्यात लावले आहेत, "आर्याच्या वर्गशिक्षिका ज्योती बोधे म्हणाल्या. आर्या सिंहगड रोडवरच्या औदुंबर सोसायटीत रहाते. तिचे शेजारीही आर्या जिंकावी म्हणून जिवापाड मेहनत करतायत. तिच्यासाठी त्यांनी सगळीकडे होर्डिग्ज लावलेत.जास्तीत जास्त एसेमेस तिला मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातायत. आर्या गेले आठ महिने घरात नाहीये. तिची आई तिच्या सोबतच आहे .व्यवसायानं डॉक्टर असलेल्या आर्याच्या बाबांना मात्र तिची खूप आठवण येतेय. तिचा रियाज करायचा तंबोरा त्यांनी तसाच ठेवलाय. तसंच आर्याची श्रद्धा असणार्‍या बिल्डिंगमधल्या दत्ताच्या देवळातही ते रोज जातात. आपल्या लाडक्या लेकीची त्यांनी एक सुंदर आठवणही सांगितली – " आर्याची आई तिच्या विद्यार्थ्यांना शिकवत होती. त्यावेळी ती पुरीया धनश्री होती. आर्या त्यावेळेला खूप लहान होती. पण तिनं तो पुरिया धनश्री अचूक गायला. हे सगळं आर्याची पणजी पाहत होती. ती आर्याच्या आईला म्हणाली की मोठेपणी उत्तम गाणारेय. तिचे ते शब्द आता खरे झाले आहेत. " आर्याच्या शिक्षकांनी, मित्रमैत्रीणींनी, नातेवाईकांनी आणि शेजा-यांनी तिला दिलेल्या शुभेच्छांना यश येवो.

close