अखेर शहिदाच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

October 25, 2013 4:29 PM0 commentsViews: 907

shaid satapa patil home25 ऑक्टोबर : शहिदांची उपेक्षा करणार्‍या सरकारला अखेर आज जाग आलीये. आज कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहीद सातप्पा पाटील यांच्या कुटुंबांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारच्या वतीनं वीरपत्नी अश्विनी पाटील यांच्याकडं मंत्र्यांनी 10 लाख रुपयांचा चेक देऊन त्यांचं सांत्वन केलं.

 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या बेलेवाडी मासा गावचा साताप्पा पाटील हा जवान जम्मूमध्ये केरनमध्ये सीमारेषेवर दहशतवाद्यांशी चकमकीत शहीद झाले होते. पण कोल्हापूरचे 2 मंत्री वगळता राज्य सरकारकडून कुणीही या पाटील कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी गेलं नव्हतं. याबाबत आयबीएन लोकमतनं बातमी प्रसारीत केली होती.

 

अखेर सरकारला या प्रकरणी जाग आली. आज खुद्द हर्षवर्धन पाटील यांनी सातप्पा पाटील यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सात्वन केलं. यावेळी सात्पापा पाटील यांचे सासरे प्रकाश पाटील, त्यांचे वडील, भाऊ, आई यांच्याशी हर्षवर्धन पाटलांनी चर्चा करुन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते.

 

दरम्यान, पिंपळगावचे शहीद जवान कुंडलिक माने आणि साताप्पा पाटील या दोन्ही वीरजवानांचं भव्य स्मारक उभारण्याची ग्वाहीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसंच बेलेवाडीतल्या शाळेच्या इमारतीसाठी सरकारमार्फत निधी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर मंत्री मुश्रीफ यांनीही शहिदांच्या कुटुंबामागे हिमालयासारखं उभं राहू असं म्हटलंय. तर वीरपत्नी अश्वीनी पाटील आणि प्रकाश पाटील यांनी आयबीएन लोकमतचे आभार मानलेत.

close