नरेंद्र मोदींचे राहुल गांधींवर टीकास्त्र

October 25, 2013 5:30 PM1 commentViews: 1849

modi in bhopal25 ऑक्टोबर :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज उत्तरप्रदेशातल्या झाशीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मी इथं रडायला आलो नाही आणि कुणाची रडकथा ऐकवायलाही आलो नाही. मी तुमचे अश्रू पुसण्यासाठी इथं आलोय. काँग्रेसच्या युवराजांना आपल्या आजीच्या हत्येचा राग आला ते मी समजू शकतो पण त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी हजारो शीख लोकांची हत्या केली त्यांचा तुम्हाला राग आला नाही का? तुम्हाला दुख झालं नाही का? असा खडा सवाल मोदींनी राहुल गांधींना विचारला.

 

तसंच राहुल यांनी ISI च्या संपर्कातील लोकांची नावे जाहीर करावी जर तसं नाही केलं तर मुसलमानाची माफी मागावी अशी मागणीही मोदींनी केली. काँग्रेसला तुम्ही साठ वर्ष सत्ता दिली आता एकदा भाजपला सहा महिने संधी देऊन बघा आम्ही देशाचं भविष्य बदलून दाखवू असं आवाहनही मोदींनी केलं.
 

उत्तरप्रदेशातील झाशीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी चौफेर तोफ डागली. काँग्रेस,सपा,बसपावर मोदींनी कडाडून टीका केली. भाषणाच्या सुरूवातील त्यांनी झांशीच्या राणी लक्ष्मीबाई याना नमन केलं. माझं सौभाग्य आहे की, मी या वीर भूमीत आज येऊ शकलो. पण मी इथं रडायला आलो नाही आणि कुणाची रडकथाही सांगायला आलो नाही. मी इथं तुमचं अश्रू पुसण्यासाठी आलोय. मी बुंदेलखंड येथील जनतेचे अश्रू पुसण्याचा संकल्प केलाय.

 

काँग्रेसच्या सरकारने जिथे जिथे पाऊल ठेवले आहे. मग ते आंध्रप्रदेश असो, महाराष्ट्र असो किंवा काँग्रेसला पाठिंबा देणारे यूपी सरकार असो या राज्यांमध्ये शेतकरी सर्वाधिक आत्महत्या का करतात? भारतातील इतर राज्यात शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची नामुष्की आली नाही. याच कारण या काँग्रेस सरकारला शेतकर्‍यांची, राज्याची कुणाचीही चिंता नाही अशी टीका मोदी यांनी केली.

 

यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीचा समाचार घेतला. समाजवादी पार्टीने जनतेची लुटालूट केलीय. दोन भावांमध्ये फूट पाडलीय. राम मोहन लोहिया जिथे कुठे असतील त्यांना खूप दुख झालं असेल अशी बोचरी टीकाही मोदींनी केली. उत्तरप्रदेशमध्ये इतकी क्षमता आहे की, ते पूर्ण देशातील गरिबी दूर करू शकते पण इथल्या सरकारला यात बिल्कुल रस नाही आणि तरूणांच्या विकासासाठीही पुढाकार घेत नाही आता अशा सरकारचं पॅकिंग करण्याची वेळ आलीय अशी टीकाही मोदींनी केली.

 

 

  • Vijay Girme

    Narendra Modi he Deshache
    bhavitavya…badalu shaktat..
    Vijay girme
    shrirampur

close