सोशल मीडियावर ‘नेतेगिरी’ !

October 25, 2013 9:13 PM0 commentsViews: 319

 आशिष जाधव, मुंबई
25 ऑक्टोबर : नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावरील प्रचाराचा धस्का काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतलाय. त्यामुळंच आता दोन्ही काँग्रेसनं कोट्यावधी रुपये खर्चुन सोशल मीडियावर प्रचार करायला सुरूवात केली आहे.

 

फेसबुक, ट्विटर किंवा ब्लॉग असो, अशा सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा सध्या बोलबाला आहे. या माध्यमातून शहरी भागातल्या मतदारांबरोबरचं तरुण वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम नरेंद्र मोदींनी मोठ्या कौशल्यानं केलंय. त्याचाच धस्का आता काँग्रेसनं घेतलाय. त्यामुळंच आता देशभरात काँग्रेसनं सोशल मीडियाची प्रशिक्षण शिबिरं घ्यायला सुरूवात केली आहे.

 
2014 ची निवडणूक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशीच असेल अशी काँग्रेसची धारणा आहे. त्यामुळेच आयडिया इज इंडिया ही संकल्पना घेऊन नरेंद्र मोदींच्या नेट प्रचार नितीशी काँग्रेस झुंजणार आहे. त्यानुसार दिल्लीस्थित इलेक्शन वॉर रुममध्ये प्रचाराचे मुद्दे आणि दिशा ठरवण्याचं काम सुरु झालंय.

 
खरंतर गेल्याच महिन्यात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं 550 कोटी रुपयांचं कंत्राट जे डब्य्‌ू टी या ऍड एजन्सीला दिलंय. या ऍड कंपनीच्या माध्यमातून तयार झालेल्या भारत निर्माणच्या जाहिराती सध्या सर्वत्र झळकतायत. त्यातून यूपीए सरकारची कामगिरी आणि काँग्रेस पक्षाची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न होतोय. विशेष म्हणजे राहुल गांधी हा पक्षाचा ब्रँड निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. राहुल गांधींची भावनिक भाषणं हा याच प्रचारतंत्राचा एक भाग आहे.

 
काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीनंही वरातीमागं घोडं दामटायला सुरुवात केलीय. पक्षाला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी राष्ट्रवादीनं ड्रायव्हिंग माईंडस या ऍड कंपनीसोबत सहा कोटी रुपयांचा करार केल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरी भागातल्या तसंच सुशिक्षित वर्गाला आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा उद्देश तर आहेच. पण त्याचबरोबर पक्षाच्या विरोधातलं घोटाळ्याचं वातावरण निवळण्याचाही प्रयत्न आहे. सोशल मीडियावरुन वातावरण निर्मिती करायची त्याचा आपापल्या पक्षासाठी फायदा करुन घ्यायचा आणि त्याचवेळी एखाद दुसरा मुद्दा घेऊन दुसर्‍याला उघडं पाडायचं अशी ही राजकीय प्रचारनिती असणार आहे.

पक्षांची निवडणुकीची तयारी

  • - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काँग्रेसचं कंत्राट
  • - जेडब्ल्यूटी ऍड एजन्सीला दिलं कंत्राट
  • - निवडणूक प्रचाराटचं कंत्राट 550 कोटींचं !
  • - याच ऍड एजन्सीच्या माध्यमातून झळकताहेत भारत निर्माणच्या जाहिराती

 

close