राज्यपालांच्या विशेषाधिकारावरुन आघाडीत ‘बिघाडी’?

October 26, 2013 6:23 PM0 commentsViews: 317

आशिष जाधव,मुंबई
26 ऑक्टोबर : सध्या राज्यातल्या बहुतेक सिंचन प्रकल्पांची कामं ठप्प आहेत. त्यातच आता नवे छोटे सिंचन प्रकल्प हाती घेण्यावरुन राज्यपालांनी राज्यसरकारला जाहीर कार्यक्रमात कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिंचनाबाबतच्या राज्यपालांच्या विशेषाधिकारावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसण्याची चिन्हं दिसत आहे.

 
सिंचन घोटाळ्याचा सर्वाधिक फटका निर्माणावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांना बसलाय. बहुतेक प्रकल्पांचा निधी केंद्र सरकार आणि राज्यपालांनी रोखून धरलाय. त्यामुळे या प्रकल्पांची कामं रखडली आहेत. यावर उतारा म्हणून 600 हेक्टर्स सिंचन क्षमतेचे 270 छोटे प्रकल्प नव्यानं हाती घेण्याचा प्रस्ताव राज्यमंत्रीमंडळानं राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवलाय.

 
या नव्या प्रकल्पांच्या यादीत राष्ट्रवादीच्या मतदार संघांमधील प्रकल्पांचाच भरणा अधिक आहे. पण सध्याची 250 हेक्टर्सपेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पांवरची बंदी उठवण्यास राज्यपाल इच्छुक नाहीत. त्यामुळेच राज्यपालांनी जाहीर कार्यक्रमात राज्यसरकारला सुनावल्याची चर्चा आहे. राज्यपाल नेमके आत्ताच का आणि तेही जाहीर कार्यक्रमात का बोलले याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झालीय. अशा पद्धतीने सिंचनाचं घोडं राज्यपालांनी अडवून धरल्यामुळं राष्ट्रवादीचे नेते हतबल झाले आहेत. आधीच सिंचन घोटाळ्याचे राजकारण मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर व्यवस्थितपणे शेकवलंय. त्यामुळे आज ना उद्या राज्यपालांच्या विशेषाधिकाराच्या मुद्यावरुन आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झालीय.

close