विनासुविधा ट्रॉमा केअरचं दार उघडलं !

October 26, 2013 10:09 PM0 commentsViews: 188

प्रफुल्ल साळुंखे, मुबंई
26 ऑक्टोबर : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापुर्वी मुंबई महापालिकेच्या सत्ताधार्‍यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय. महापालिकेच्या वतीनं जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय उभारण्यात आलं. पण कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना रुग्णालयाचं उद्‌घाटन करण्यात आलं. याठिकाणी सर्व सुविधा सुरु व्हायला किमान तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे.

 
मुंबई महापालिकेच्या वतीनं 125 कोटी रुपये खर्च करुन अद्ययावत ट्रामा केअर रुग्णालय उभारण्यात आलंय. पण या ट्रॉमा सेंटरमध्ये अनेक अत्यावश्यक सुविधाच नाहीत.

 
अपुर्‍या सुविधा

  • 304 रुग्णखाटा
  • ट्रॉमा सेंटर
  • सिटी स्कॅन
  • सोनोग्राफी
  • प्रयोगशाळा
  • अद्ययावत ऑपरेशन थिएटर

 
या सारखी कुठलीही सुविधा अजूनही या रुग्णालयात सुरू झालेली नाही. एवढचं नाही तर या सर्व विभागांची साहित्य, मशीनरीच उपलब्ध नाही. या सर्व विभागांच्या खोल्या अजूनही रिकाम्या आहेत. केवळ ओपीडी सुरु आहे. आलेल्या पेशंटला उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येतंय. रुग्णालयात काहीही सुविधा नसताना या रुग्णालयाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले हेही या वेळी उपस्थित होते. निवडणूक आचारसंहिता पाहता घाईनं हे उद्घाटन झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. साहजिकच हे आरोप शिवसेनेला मान्य नसतील. एकूणच, नागरिकांना सुविधा मिळाल्या नाही चालतील पण राजकीय श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे असंच सध्या सुरू आहे. शेवटी निवडणुका आहेत राव….

close