फरार अतिरेकी अफझल उस्मानी सापडला

October 28, 2013 3:20 PM0 commentsViews: 622

afzal usmani28 ऑक्टोबर : मुंबई सेशन्स कोर्टाच्या परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला दहशतवादी अफझल उस्मानीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. उस्मानीला एटीएसने नेपाळच्या सीमारेषेवरुन अटक केली आहे. उस्मानी हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना ऐनवेळी एटीएसने मोठ्या शिताफीने त्याला अटक केलीय.

 

उस्मानी हा सुरत स्फोटातील मुख्य आरोपी आहे. 20 सप्टेंबर रोजी तो मुंबई सेशन्स कोर्टाच्या आवारातून पळाला होता. दीड महिन्याच्या तपासानंतर अखेर उस्मानीला अटक करण्यात आलीय. एटीएसचे प्रमुख राकेश मारीया यांनी बातमीला दुजोरा दिलाय.

 
20 सप्टेंबर रोजी मुंबईच्या सेशन्स कोर्टातून इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी अफझल उस्मानी पोलिसांच्या तावडीतून पळाला होता. सुरत बॉम्बस्फोट प्रकरणी अफ झल उस्मानीला कोर्टात हजर करतेवेळी पोलिसांच्या तावडीतून तो पळाला होता. उस्मानीचा शोध घेण्यासाठी 20 टीम मागावर होत्या.

 

उस्मानी कोर्टातून पळाल्यानंतर मुंबईतील धारावी झोपडपट्टीत त्याच्या बहिणीकडे जाऊन लपला होता. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून त्यांने दाढी मिशा काढून वेशांतर केलं होतं. काही दिवस आपल्या बहिणीकडे राहिल्यानंतर तो बोरिवली इथं गेला तिथून त्यांने बसने सुरत गाठले. सुरतला गेल्यानंतर तो इंदोरला गेला. उस्मानी प्रत्येक वेळा आपली ठिकाण बदलत होता. भारत सोडून जाण्याच्या तयारीत तो नेपाळ आणि भारतच्या सीमारेषेवर रुपयदिना रेल्वे स्टेशनवर पोहचला होता. रेल्वे रुळ ओलांडत असताना एटीएसच्या अधिकार्‍यांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला लखनऊ इथं आणण्यात आलं.

 

त्यांची चौकशी केल्यानंतर रविवारी रात्री त्याला मुंबईत आणण्यात आलंय. तब्बल दीड महिना उस्मानी फरार होता याकाळात तो दहशतवादी संघटनेशी भेटला का? कुठल्या घातपात कारवायात सहभागी झाला का याची चौकशी आता पोलीस करत आहे. उस्मानी हा सुरत बॉम्बस्फोट प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. त्याला 2008 मध्ये नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली होती. उस्मानी याने सुरत स्फोटांसाठी स्फोटकांनं भरलेल्या गाड्या चोरल्या होत्या. त्यानंतर तो इंडियन मुजाहिद्दीन संघटनेत सहभागी झाला होता.

close