‘ये कोन है..चल बाहर निकल’

October 28, 2013 8:38 PM0 commentsViews: 3527

kapil on dawod28 ऑक्टोबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नावाची भल्याभल्यांना चांगलीच धडकी भरते मात्र त्याच डॉनला माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी ‘ये कोन है..चल चल बाहर निकल’ असं म्हणत अक्षरश: ड्रेसिंग रुममधून हाकलून लावाण्याचा धाडसी पराक्रम केला होता. हा किस्सा होता 1985 च्या शारजाह कप स्पर्धेतला. माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांची जळगावात एका कार्यक्रमात प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी त्यांनी हा धाडसी किस्सा सांगितला.

 

या मुलाखतीत वेंगसकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, शारजाह कप स्पर्धेत भारतानं पाकला हरवलं तर आपण प्रत्येक भारतीय खेळाडूला टोयोटा कार देण्याची ऑफर दाऊद इब्राहिमनं दिली होती असा खळबळजनक गौप्यस्फोटही वेंगसरकर यांनी केलाय.

 

 

1985 ला पाकिस्तानात शारजा कप स्पर्धेदरम्यान खुद्द दाऊद इब्राहिम हा अभिनेता मेहमूद  सोबत ड्रेसिंग रुममध्ये येऊन बसला होता. त्यावेळी कपिल देव एका पत्रकार परिषदेसाठी बाहेर गेला होता. दाऊद जेंव्हा रुममध्ये आला तेंव्हा त्याला कुणीही ओळखलं नाही. दाऊद हा दुबईतला मोठा बिझनेसमन आहे अशी ओळख मेहमूदने करुन दिली होती. जर तुम्ही उद्याच्या मॅचमध्ये पाकिस्तानला हरवलं तर प्रत्येक खेळाडूला एक टोयाटो कार देण्यात येईल अशी ऑफर दाऊदने दिली होती. तिथे आमचे जयवंत लेले नावाचे मॅनेजर होते त्यांनी आपल्याला कार मिळेल का अशी विचारणा केली तर दाऊदने खुश होऊन तुलाही कार मिळेल असं म्हटलं होतं.

 

त्यानंतर कपिल देव ड्रेसिंग रुममध्ये आला आणि मला माझ्या टीमसोबत थोडं बोलायचं आहे तुम्ही सगळे जण बाहेर जा अशी विनंती केली, पहिले त्यांनी मेहमूद यांना जाण्यास सांगितलं आणि तितक्यात कपिल यांची नजर दाऊदवर पडली आणि ‘ये कोन है….चल बाहर निकल’असं म्हणून कपिल देव यांनी दाऊदला बाहेर काढलं होतं. कपिल देव यांनी दाऊदला बाहेर काढल्यानंतर तो साहजिकच चिडला होता आणि त्याने बाहेर जाऊन आपल्या पंटर लोकांना कारची ऑफर रद्द करा अशी सुचना केली होती. त्यानंतर जावेद मियाँदाद म्हणाले होते की, कपिल यांना दाऊदबद्दल माहिती नाही का? तो उद्या त्याला त्रास देईल. पण मी म्हटलं, कपिलला भारतात आणि भारताबाहेर कुणीच त्रास देऊ शकत नाही अशा शब्दात मियाँदादला सुनावल्याचा किस्सा वेंगसकर यांनी सांगितला.

close