IBN लोकमत इम्पॅक्ट : अखेर साखळदंडातून त्याची सुटका !

October 28, 2013 10:25 PM0 commentsViews: 1700

पंकज क्षीरसागर, परभणी

28 ऑक्टोबर :परभणीमधल्या पाथरी तालुक्यातल्या कानसूर इथं मरणप्राय जगणं जगणार्‍या ज्ञानेश्वर शिंदे याची अखेर साखळदंडातून सुटका करण्यात आलीये. गेली 10 वर्षं ज्ञानेश्वरला त्याच्या घरच्यांनीच एका खोलीमध्ये बांधून ठेवलं होतं. आयबीएन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर आता ज्ञानेश्वरला उपचार मिळणं शक्य होणार आहे.

 

परभणीतल्या पाथ्री तालुक्यातल्या कानसूर इथला ज्ञानेश्वर गेली 10 वर्षं आपल्या शेतातल्या एका पत्र्याच्या खोलीत बंदिस्त आयुष्य जगत होता. मनोरूग्ण असलेल्या ज्ञानेश्वरला त्याच्या घरच्यांनीच साखळ्यांनी बांधून या खोलीत ठेवलं होतं. प्रातर्विधीपासून ते खाणं-पिणं, झोपणं हे सगळं इथं याच खोलीत तो करायचा.. उपचारांऐवजी ज्ञानेश्वरला मिळत होतं असह्य असं भयानक जगणं. पण आता मात्र ज्ञानेश्वरची या सगळ्यांतून सुटका झालीये. त्याच्या साखळ्‌या तोडल्यात आणि त्याला कपडेही मिळालेत. आता ज्ञानेशवर माणसांत आलाय. आयबीएन लोकमतवर ही बातमी दाखवल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक नेते कल्याण रेंगे यांनी पुढाकार घेऊन ज्ञानेश्वरच्या उपचाराची जबाबदारी उचललीये आणि त्यांना साथ मिळाली ती गावातल्या लोकांची.

 

आयबीएन लोकमतनं ज्ञानेश्वरची ही अवस्था दाखवली. पाथ्रीचे डीवायएसपी ए.आर.रोडे यांनी स्वत: जाऊन ज्ञानेश्वरची अवस्था पाहिली आणि तातडीनं कायदेशीर प्रक्रियेला सुरूवात केली. पण ज्ञानेश्वरची ही परिस्थिती समोर आली ते त्याच्या शेजार्‍यां दिलीप शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे. पण ज्ञानेश्वर मनोरूग्ण आहे. त्याचा इतरांना त्रास होईल म्हणूनच आपण त्याला असं बांधून ठेवलं होतं, असं तुकाराम शिंदे, ज्ञानेश्वरचा भावाचं म्हणणं आहे.
कुटुंबाचा आधार असेल तर कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वरला त्याच्या कुटुंबाच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज होती, त्यावेळेस त्यांनी त्याला असं दूर केलं. असं जरी असलं तरी गावपातळीवरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जर मानसोपचाराची सुविधा उपलब्ध झाली तर ज्ञानेश्वरसारखी काही बंदिस्त आयुष्य तरी नक्कीच मोकळी होतील.

close