लाच घेताना अभियंता कॅमेर्‍यात कैद

October 30, 2013 1:33 PM0 commentsViews: 1042

nagpur engineerप्रवीण मुधोळकर, नागपूर
30 ऑक्टोबर : सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदाराकडून बिल मंजूर करण्यासाठी सर्रास लाच घेतली जाते याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहे.

 
नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांची बिलं मिळवून देण्यासाठी सर्रास लाच मागितली जातीये. असाच अनुभव आलाय विजय गभणे यांना. गभणे सार्वजनिक बांधकाममध्ये सुशिक्षित बेरोजगार इंजिनिअर म्हणून नोंदणीकृत आहेत. नागपूरच्या मनोरूग्णालयातल्या 3 लाख 40 हजारांच्या कामाच्या बिलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ज्युनिअर इंजिनिअर गिरीधर कुकरेजा यानं गभणे यांच्याकडून 27 हजारांची लाच मागितली आणि ही लाच दिली नाही तर त्यांना कुठेही काम मिळणार नाही, अशी धमकीही त्याला देण्यात आली.

 
विभागात कुठलेही काम केल्यानंतर काँन्ट्रक्टर्सना बिल मंजूर करण्यासाठी जेई 2 टक्के, डेप्युटी इंजिनिअर 2 टक्के तर एक्सिक्युटीव्ह इंजिनिअरला 2 टक्के लाच द्यावी लागते. या सीडीमधील संभाषणातून एकटा जेई 10 टक्क्यांपेक्षाजास्त लाच मागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार किती फोफावला आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

 
गभणे यांच्याकडे कुठलाही पर्याय नसल्यानं त्यांनी हे संभाषण स्वत:च्या मोबाईमध्ये रेकॉर्ड केलं. या संभाषणाच्या सीडीसह त्यांनी नागपूरच्या अँटी करप्शन ब्युरोकडे 2 जुलै रोजी तक्रारही केली. पण गेल्या तीन महिन्यात या तक्रारीवर अँटी करप्शन विभागानं कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतरही गिरधर कुकरेजा अजूनही कार्यरत आहेत. तर अँटी करप्शन विभागाला याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण द्यायला टाळाटाळ केली.

close