आंध्रात ‘बर्निंग बस’, 44 प्रवासी ठार

October 30, 2013 2:07 PM0 commentsViews: 260

andhara bus30 ऑक्टोबर : आंध्र प्रदेशातल्या मेहबूबनगर जिल्ह्यात एका लक्झरी बसनं पेट घेतलाय. या अपघातात 44 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या बसमधल्या 49 प्रवाशांपैकी फक्त 10 प्रवाशीच बचावले असल्याची माहिती मिळतेय.

 

डिझेल टँकमध्ये स्फोट झाल्यानं या बसला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार जब्बार ट्रॅव्हल्सची ही बस बंगळूरूहून रात्री 10 वाजता हैदराबादकडे निघाली होती. सकाळी 6.30 च्या सुमारास बस हैदराबादमध्ये पोहचणार होती. बस हायवेवर असताना बसमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते. या अपघातातून गाडीचा ड्रायव्हर, क्लिनर आणि सफाई कर्मचारी बचावले त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

 

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये स्फोट झाल्यानंतर बसने पेट घेतला काही अंतर पार करून बस थांबली आणि काही कळायच्या आताच बस आगीच्या विळखात सापडली. काही मिनिटातच बस जळून खाक झाली. मृतदेह जळाल्यामुळे प्रवाशांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहे. आतापर्यंत 29 प्रवाशांची अधिकृत माहिती मिळू शकली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग आटोक्यात आण्यात आलीय. या घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहे.

close