सरांबाबत सेनेचं ‘नो कॅमेन्ट’ !

October 30, 2013 9:42 PM0 commentsViews: 698

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

30 ऑक्टोबर : शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचे राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटलेत. नारायण राणे यांनी जोशींवर पलटवार केलाय. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी मुलाखत पाहिली, पण त्यावर बोलायला मात्र कुणीही तयार नाहीये.

पक्ष नेतृत्वावर टीका केल्यानंतर मनोहर जोशींना थेट दसरा मेळाव्यातून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर ते पक्ष सोडणार की त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणार अशा चर्चेला ऊत आला होता. पण नाराजीनाट्यानंतर आयबीएन लोकमतला दिलेल्या पहिलीच सविस्तर मुलाखत दिली आणि शिवसेनेत खळबळ उडाली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी फोनवरून प्रतिक्रिया बालून दाखवली, पण कॅमेरासमोर बोलायला नकार दिला.

मनोहर जोशींच्या मुलाखतीनंतर आम्ही अनेक सेना नेत्यांशी संपर्क साधला. पण सध्या जोशींवर नेतृत्वाची खप्पामर्जी असल्यामुळे कुणीही या विषयावर बोलण्याची हिंमत करत नाहीये. आम्ही ज्या बुजुर्ग नेत्यांशी बोललो, त्यांनी मात्र अपेक्षा व्यक्त केली की नेतृत्वाने लवकरात लवकर जोशींची नाराजी दूर करावी.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच भाषण झालं, पण त्यांनीही पंतांना अनुल्लेखाने मारलं. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या समोर नवाकाळचे संपादक निळकंठ खाडीलकर यांनी जोशींवर टीका केली, पण त्यांना पक्षात ठेवा, असं आवाहन केलं. जोशींनी मुलाखतीत राणे, भुजबळांवरही जोरदार टीका केली. त्यावर उत्तर नाही देणार, ते राणे कसे.. मनोहर जोशी आणि षडयंत्र हे एक समिकरणच होत अशी प्रतिउत्तर राणेंनी दिलं.

उद्धव ठाकरेंवर माझा राग नाही. बोलावलं नाही, तरी मातोश्रीवर जाईन. अशी विधानं मुलाखतीत करून पंतांनी उद्धव ठाकरेंसोबत संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न केलेत. त्यावर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close