‘घड्याळा’त तिसर्‍या आघाडीचा ‘गजर’

October 31, 2013 2:44 PM0 commentsViews: 19

Image img_232402_ncp52353_240x180.jpg31 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसने बिगर काँग्रेस बिगर भाजप पक्षांच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आलंय. राष्ट्रवादीसमोर सगळे पर्याय खुले आहेत, असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटल्यामुळे काँग्रेसने भुवया उंचावल्या आहेत. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध अधिक ताणले जाणार आहेत. तसंच यामुळे राज्यात आणि केंद्रामध्ये भविष्यातलं राजकारणं कोणत्या दिशेने जाऊ शकतं, याचेही संकेत मिळतायत.

नवी दिल्लीत भरलेल्या या राजकीय संमेलनात 2014 नंतरचं राजकारण बदलण्याची क्षमता आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्याचं निमित्त करून दिल्लीत झालेल्या या संमेलनात नवी तिसरी आघाडी आकाराला येताना दिसली. पण सगळ्यांचं लक्ष होतं ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस असलेल्या डी पी त्रिपाठींकडे. बिगर काँग्रेस पक्षांच्या संमेलनात हजेरी लावून राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय की, 2014 नंतर ते तिसर्‍या आघाडीमध्ये सामील होऊ शकतात. आम्हाला पक्ष वाढवायचाय, म्हणून आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं पवारांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनीही या संमलेनाचं स्वागत केलं होतं. तिसरी आघाडी अस्तित्वात आली, तर चांगलंच होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. तर राष्ट्रवादी दबाव तंत्राचा वापर करतंय, असा आरोप काँग्रेसने केलाय.

2009 सालच्या लोकसभा निवडणुकीआधीही राष्ट्रवादीने तिसर्‍या आघाडीतल्या पक्षांसोबत काही राज्यांमध्ये समझोते केले होते. यावेळी तर बिगर काँग्रेस बिगर भाजप आघाडीची सत्ता येण्याची शक्यता गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त आहे, असं वेगवेगळे सर्व्हे सांगत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आतापासूनच आपले सर्व पर्याय खुले ठेवू इच्छीत आहे.

close