असा असेल ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’

October 31, 2013 4:32 PM0 commentsViews: 15

अलका धुपकर, गुजरात

31 ऑक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलं. गेली अनेक वर्षं प्रस्तावित असलेला हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि त्यांचं ऐतिहासिक स्मारक नर्मदा नदीत उभारण्याचा हा प्रकल्प आहे.

गुजरातमधील प्रसिद्ध नर्मदा नदी आणि त्यावरचा हा प्रसिद्ध सरदार सरोवर. याच सरोवराच्या खाली, पात्रामध्ये साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. भारताचे पोलादी पुरूष म्हणून ओळखल्या जाणार्‍या वल्लभभाईंचा धातूचा पुतळा हा जगातला सर्वात उंच म्हणजेच 182 फूट उंचीचा बनवला जाईल. त्यासाठीचं धातू दान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी देशभरातल्या नागरिकांना केलंय.

सरदार वल्लभभाई पटेलांच्या कार्याची महती कळावी, यासाठी हा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारला जातोय. पण, इथं फक्त हा पुतळाच नाही तर त्यांचं भव्यदिव्य असं स्मारक असेल. मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

असा असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी

========================================================================
- पुतळ्याची उंची – 182 मीटर (392 फूट) आणि एकूण उंची 240 मीटर
- एकूण प्रस्तावित खर्च – 2,600 कोटी रु.
- पुतळाच्या नजरेतून संपुर्ण सरदार सरोवराच्या विलोभनीय दृश्याची पाहणी करता येईल, अशी योजना
- पुतळ्यापर्यंत पोचण्यासाठी बोटिंगची व्यवस्था केली जाईल
- केवडिया कॉलनीभोवतीच्या गावाचा पर्यटन विकासासाठी विचार केला जाईल
- या प्रकल्पासाठी जागतिक टेंडर्स मागवण्यात आली आहेत
- सध्या चीनमधला 153 मीटर उंचीचा स्प्रिंग टेम्पल बुद्धा हा जगातला सर्वात उंच पुतळा मानला जातो
- स्टॅच्यू ऑफ युनिटी हा अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दुप्पट उंचीचा असेल
- तर ब्राझीलमधल्या रिओ डी जेनेरोच्या पाच पट उंचीचा असेल
- पुढच्या चार वर्षात हा प्रकल्प बांधून पूर्ण केला जाईल
- यासाठी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टची स्थापना करण्यात आलीय.
===========================================================================

स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बांधकाम कधीही पूर्ण होऊ दे पण निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाचं जंगी भूमिपूजन करुन नरेंद्र मोदींना सार्‍या जगाचं लक्ष वेधता येईल, तसंच काँग्रेसला राजकीय उत्तरही देता येईल.

close