सलीमभाईची ‘मनसे’ गोसेवा !

October 31, 2013 9:01 PM0 commentsViews: 40

 कपिल भास्कर, नाशिक
31 ऑक्टोबर : आज गोवत्स द्वादशी, अर्थात् वसुबारस…दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी…या आनंदात आजपासून खर्‍या अर्थानं दिवाळीची सुरुवात झालीये. दिवाळीत लक्ष्मीच्या वेगवेगळ्या रुपांची आराधना केली जाते. ग्रामीण भागातल्या शेतकर्‍याची खरी लक्ष्मी ती त्याचं गोधन. आजच्या वसुबारस निमित्तानं नाशिकमधल्या सलीमभाईंची आगळीवेगळी गोसेवा..

गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात करणारी परंपरा आता वाढत्या शहरीकरणात मागे पडलीए. शहरवासीयांना गुरं पाहायला मिळतात ती फक्त रस्त्यात भटकणारी, रहदारीला अडथळा आणणारी. मनसेचे नाशिकमधील नगरसेवक सलीम शेख हे मात्र भटक्या गुरांच्या वेदनेनं अस्वस्थ झाले. खुरांच्या आणि शिंगांच्या अनावश्यक वाढीमुळे रस्त्यावरच्या गुरांना होणारा त्रास ते बघत होते. त्यातूनच त्यांनी सुरूवात केली त्यांच्या सेवेची..

यासाठी त्यांनी एक टीमच तयार केलीए. त्यात स्वयंसेवकांपासून गुरांच्या डॉक्टरांपर्यंत बरेचजण आहेत. आतापर्यंत त्यांनी पन्नास पेक्षा जास्त गुरांच्या मोफत शस्त्रक्रिया करून जखमांच्या वेदनांपासून त्यांना मुक्ती दिली आहे. रस्त्यावरच्या जखमी जनावरांना बघून प्रत्येकाची मनं हळवी होतात. पण सलीम शेख आणि सातपुरकरवासीयांनी दाखवलेली भूतदया कौतुकास्पद आहे.

close