नरेंद्र मोदींना विशेष सुरक्षा

November 1, 2013 4:36 PM0 commentsViews: 23

narendra modi security01 नोव्हेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज पुन्हा पाटण्यामध्ये जाणार आहेत. पाटणा साखळी स्फोटात मृत्यमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.

या स्फोटात नरेंद्र मोदी टार्गेट होते अशी माहिती सूत्रांनी दिली यामुळे मोदींच्या या दौर्‍यासाठी अतिरीक्त सुरक्षा पुरवण्यात आलीय. मोदींना यावेळी विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार आहे, असं सांगण्यात येतंय. नरेंद्र मोदी जिथेजिथे जाणार आहेत त्या सहाही ठिकाणी विशेष कृती दलाचे 1 हजाराहून जास्त जवान तैनात असतील.

त्याचबरोबर पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचे 100 अधिकारी आणि डीएसपी दर्जाचे 15 अधिकारी मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत असणार आहेत. गुप्तचर यंत्रणांनीही मोदींच्या पाटणा दौर्‍याबद्दल अलर्ट जारी केलाय. नितीशकुमार यांच्या पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींचा हा दौरा कसा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पण त्याआधी नरेंद्र मोदी पुण्यामध्येही येणार आहेत. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी इमारतीचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी शहर भाजपतर्फे लोहगाव विमानतळावर मोदींचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

विमानतळाबाहेर मोदींची छोटी सभाही ठेवण्यात आलीय. मोदी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनीही सभेला हजर रहावं असं भाजपनं आवाहन केलंय. पाटण्यात सभेआधी झालेले बॉंबस्फोट पाहता कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. गुजरात पोलिसांचं पथकही पुण्यात दाखल झालंय. यावेळी पुणे पोलिसांनीही विमानतळ परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला.

close