फिल्म रिव्ह्यु : ‘क्रिश 3′

November 2, 2013 8:17 PM2 commentsViews: 497

अमोल परचुरे, समीक्षक

कोई मिल गया नंतर क्रिश आणि आता थेट क्रिश 3… क्रिश 2 कधी रिलीज झाला हे कोडं कोणालाच उलगडलेलं नाहीये आणि क्रिश 3 बघूनही ते उलगडत नाही. क्रिश 3 ही एक सुपरहिरो फिल्म आहे. क्रिश हा सुपरहिरो आहेच, पण त्याचबरोबर तो प्रेमळ पती आणि आदर्श मुलगासुद्धा आहे, सुपरहिरो फिल्मला खास भारतीय टच देण्यासाठी सुपरहिरोमध्ये हे सगळे गुण असणं गरजेचं आहेच, आणि हा आहे राकेश रोशनचा सिनेमा, म्हणजे नेहमीचा सगळाच मसाला भरण्याचा पूर्ण प्रयत्न रोशन कुटुंबाने केलेला आहे.

बॉलिवूडमध्येही अनेक सुपरहिरो सिनेमे झालेले आहेत, पण तंत्राच्या बाबतीत विचार केला तर क्रिश 3 हा त्यातला सर्वात आधुनिक सिनेमा म्हणायला लागेल. पण तंत्राबरोबरच चांगल्या कथेचा मंत्रही सिनेमा यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो. बॉक्स ऑफिसच्या नव्या गणितांमुळे 100 कोटी वगैरे कमाई हा सिनेमा करेलही पण म्हणजे तो सिनेमा चांगला ठरत नाही. स्पेशल इफेक्टसनी डोळे दिपून जाणार एवढ्यात प्रेमाने ओथंबलेले, मेलोड्रॅमॅटिक संवाद ऐकायला मिळतात आणि आपण 30-40 वर्षांपूर्वीचा सिनेमा बघतोय असं वाटायला लागतं. त्यातही कथेमध्ये स्पायडरमॅन, X-मेन, बॅटमॅन, ऍव्हेंजर्स आणि अगदी मेगामाईंड या हॉलिवूडपटावरुन उचललेले प्रसंगही बघायला लागतात.

काय आहे स्टोरी?
krrish 3 film review
क्रिश 3 मध्येसुद्धा सुपरहिरोचा मुकाबला बॅडमॅनशी आहे. हा बॅडमॅन आहे काल (विवेक ओबरॉय), जीवघेणा व्हायरस पसरवून लोकांमध्ये दहशत पसरवणं आणि मग त्यावरील प्रतिबंधात्मक लस विकून बक्कळ पैसा कमावणं हा याचा धंदा. मग यात कितीही लोकं मेली तरी चालतील एवढा हा क्रूर आहे. या जैविक हल्ल्याचा मुकाबला क्रिशला करायचा आहे. अर्थात, यामध्ये बाकी कौटुंबिक आणि प्रेमाचा ट्रॅकही आहे.

रोहित मेहरा म्हणजे क्रिशच्या वडिलांचं संशोधन, त्याचा वापर, कालने निर्माण केलेली काया(कंगना राणावत) नावाची सुपरवुमन, तिचा कृष्णा अर्थात क्रिशमध्ये वाढलेला इंटरेस्ट, मग त्यांच्यामध्ये ड्रीमसाँग असा सगळाच मसाला भरायचा प्रयत्न राकेश रोशन यांनी केलेला आहे. पण त्यामुळे प्रेक्षकांचं अपचन होईल याचा विचार काही त्यांनी केलेला नाही. चांगलं पॅकेजिंग करुन प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट देण्याचा प्रयत्न राकेश रोशन यांनी केलाय, पण पॅकेट उघडल्यानंतर गिफ्ट बघितल्यावर प्रेक्षकांचा दिवाळीचा आनंदच नाहीसा होईल असाच सगळा प्रकार आहे.

नवीन काय?
krrish 3 film review1
कोई मिल गया किंवा क्रिशच्या कथेमध्ये जो प्रवाहीपणा होता तो या क्रिश 3 मध्ये दिसत नाही. क्रिशमध्ये सुपरपॉवर कशा आल्या इथपर्यंतचा जो प्रवास होता तो खूपच गतिमान आणि इंटरेस्टींग होता. एकदा सुपरपॉवर आल्यानंतर क्रिशचं ऍडव्हेंचर दाखवण्यात मात्र राकेश रोशनला पूर्णपणे अपयश आलंय. यामध्ये अगदी तुकड्या-तुकड्यात सिनेमा आवडू शकेल. कंगना राणावत कायाचं रुप बदलून प्रियांका चोप्राच्या रुपात ह्रतिकच्या घरात राहायला लागते, तेव्हाचे सीन्स खूप चांगले झालेत. क्लायमॅक्सला अगदी हॉलिवूडपटाला लाजवेल एवढा विध्वंस केलेला आहे. काचांच्या इमारतींचा चक्काचूर, उंच उंच इमारतीचं कोसळणं असं सगळं मुंबईत घडताना दाखवलेलं आहे. काही वेळ अगदी हॉलिवूड सिनेमा बघतोय असं वाटतं पण थोड्यावेळाने या विध्वंसक ऍक्शनचाही कंटाळा यायला लागतो.

परफॉर्मन्स

krrish 3 film review5
क्रिश 3 मधला दिलासा आहे तो म्हणजे ऋतिक रोशन… रोहित मेहरा, कृष्णा मेहरा आणि क्रिश अशा तीन तीन भूमिका त्याने केलेल्या आहेत. बाप आणि मुलगा यांच्यातील काही सीन्समध्ये तर हे दोघे हृतिक आहेत हे विसरायला लावणारी त्याची अदाकारी आहे. प्रियांका चोप्राला थोडं रडण्याचं आणि थोडं घाबरण्याचं यापलीकडे फार काम नाहीये. सरप्राईझ आहे ते कंगना राणावतचं. काया ही बॅड वूमन तिने उत्तम साकारलीये, अर्थात अजूनही तिची डायलॉग डिलीव्हरी खटकतेच, आणि असाच खटकतो विवेक ओबेरॉयचा काल…ओव्हरऍक्टींग करुन विवेकने सिनेमा आणखी कंटाळवाणा करुन टाकलाय. केवळ आणि केवळ हृतिकसाठीच हा सिनेमा तुम्ही एकदा बघू शकता, राकेश रोशन यांच्या सिनेमात असणारी सुमधूर गाणीसुद्धा इथे मिसिंग आहेत. एकंदरित, तंत्राची कमाल, पण पटकथा सुमार असंच या सिनेमाबद्दल सांगता येईल.

 

‘क्रिश 3′ ला रेटिंग – 40

  • VÏñåy AK

    ….Awesome Movie Aahe yaarr……come onn

  • akash bidkar

    KRISHH 3 IS BEST MOVIE LIKE KOI MIL GAYA AND KRISH….I WATCHED 3 TIMES…

close