‘… म्हणून शेतमालाच्या किंमतीत झाली वाढ’

November 4, 2013 2:54 PM0 commentsViews: 26

sharad pawar4 नोव्हेंबर : शेतमालाच्या वाढलेल्या दरांवरुन कृषीमंत्री शरद पवारांवर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच रविवारी शरद पवारांनी शेतमालाच्या वाढत्या किंमतीसाठी  शेतकरांच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीला कारणीभूत ठरवले आहे.

 

शेतीसाठी आवश्यक असलेले खत, औषध, इंधन यांच्या दरात भरघोस वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. शेतमालाचे दर कमी करायचे असतील तर आधी इंधन व अन्य गोष्टींचे दर कमी करुन शेतक-यांच्या उत्पादन खर्चात कपात करायला हवी असा तोडगाही शरद पवारांनी सुचवला आहे.
कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, शेतमालाला चांगले दर मिळावे हेच माझे धोरण आहे. उत्पादन खर्च वाढल्याने शेतक-यांच्या हितासाठी शेतमालाचे दर वाढवावे लागते. त्यामुळे आधी उत्पादन खर्च कमी केल्यास मालाचे दर वाढवण्याची आवश्यकता भासणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

कांद्यावरुन सुरु असलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले.  देशातील वाढत्या महागाईवर वारंवार कृषी मंत्र्यांना जबाबदार ठरवले जाते. हे चुकीचे असल्याचे पवार यांनी या कार्यक्रमात सांगितले. दिल्लीत कांदाचा भाव वाढला की माझ्या घरावर नेहमी मोर्चा येतो. दरवाढ झाल्यास मलाच प्रश्न विचारली जातात, सर्वसामान्यांच्या डोळ्यात पवारांनी पाणी आणले अशी चर्चा रंगू लागते. हे सर्व गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत असल्याने माझी कातडी आता बधीर झाल्याचे पवारांनी नमूद केले. महागाईवरुन पत्नीनेही माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केल्याची आठवण पवारांनी सांगितली. महागाई वाढत असतानाच तुम्हाला झोप तरी कशी येते ? असा सवाल पत्नीने विचारल्याचे त्यांनी सांगितले.

close