कोलकाता सचिनमय..!

November 5, 2013 2:25 PM0 commentsViews: 85

Image sachin_acs_300x255.jpgक्रिकेटमधील प्रदीर्घ कालावधीनंतर निवृत्ती घेणा-या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या समारोपाच्या मालिकेसाठी कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर जय्यत तयारी सुरु आहे. ईडन गार्डनवर १९९ वी कसोटी खेळणा-या सचिनला मानवंदना देण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सामन्याच्या अखेरच्या दिवशी सचिनवर हॅलिकोप्टरमधून  पुष्पवृष्टी करण्यात येणार असून यासाठी तब्बल १९९ किलो गुलाबाच्या पाखळ्यांनी ही पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

 
क्रिकेटमध्ये सातत्त्यपूर्ण खेळी करुन जगभरातील गोलदाजांच्या मनात धडकी भरवणारा भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर विडींजविरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून सचिन कसोटी सामन्यांचे द्विशतक पूर्ण करणार आहे. यातील सचिनची १९९ वी कसोटी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. ही कसोटी सचिनसाठी अविस्मरणीय व्हावी यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने  (CAB) जय्यत तयारी सुरु केली आहे.

 

 

स्टेडियमच्या बाहेर सर्वत्र सचिनचे मोठ मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या सामन्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने  (CAB) सचिनचे मानवी पुतळे बनवले असून त्यावर सचिनचे दुर्मिळ फोटो हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. हे पुतळे सामना सुरु होण्यापूर्वी ते सामना संपेपर्यंत संपूर्ण शहरात फिरतील. या उपक्रमाचे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री मदन मिश्रा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 
स्टेडियमच्या आतही सचिनमय वातावरण दिसेल. स्टेडियमच्या ड्रेसिंग रुमच्या बाहेर  ‘मी देवाला बघितलंय. भारतासाठी तो चौथ्या नंबरला बॅटिंग करायला येतो’ हे मॅथ्यू हेडनचे उद्गार लावण्यात आले आहे. तसेच ड्रेसिंग रुममध्ये सचिनचा मेणाचा पुतळाही लावण्यात आला आहे. हा पुतळा सचिनला भेट म्हणून दिला जाईल. एवढच नव्हे तर क्रिकेटच्या या देवाला सलाम करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनींही राजकारणातून वेळ काढून सचिनसाठी विशेष तयारी केली आहे. ममता बॅनर्जी स्वतः काढलेले एक चित्र सचिनला भेट म्हणून देणार आहेत. तसेच कोलकात्यातील कमांडो, पॅराड्रॅपर्स सचिनचा खास पध्दतीने सत्कार करतील.

close