जीवाची शाळा !

November 9, 2013 8:32 PM0 commentsViews: 37

कन्हैय्या खंडेलवाल, हिंगोली

09 नोव्हेंबर : एकीकडे भारताची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने होत असल्याची चर्चा होत असतानाच दुसरीकडे मात्र अनेकांना मूलभूत हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. हिंगोली जिल्ह्यातल्या औढा तालुक्यामधल्या पोटा खुर्द गावात पूर्णा नदी वाहते. या नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी धोकादायकपणे नदी पार करावी लागते.

लालबहादूर शास्त्री शिक्षण घेण्यासाठी नदी पार करुन जायचे ही कथा आपण सगळ्यांनी ऐकलीय. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 66 वर्षांनंतरही नंतरही हिंगोली जिल्हातल्या टाकळ गव्हाण, नालेगाव, पोटा खुर्द या गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. या गावांमधून वाहणार्‍या पूर्णा नदीवर पूल बांधल्या नसल्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागतीये.

केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानानुसार शिक्षणवाडी वस्तीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. मात्र या सगळ्या भागात या अभियानाचं कोणतही चिन्ह दिसत नाही. या परिसरातील जवळपास 200 विद्यार्थ्यांना या सगळ्याचा फटका बसतोय. पावसाळ्यासोबतच शैक्षणिक वर्षाची सुरूवात जूनमध्ये होते खरी. मात्र मुसळधार पावसामुळे या भागातल्या शाळा तब्बल चार महिने बंदच ठेवाव्या लागतात. आता या नदीवर पूल बांधण्यासाठी आता सरकार आणखी किती वर्ष लावणार असा प्रश्न या गावकर्‍यांना पडलाय.

close