फिल्म रिव्ह्यु : ‘सत्या 2′

November 9, 2013 10:12 PM0 commentsViews: 301

अमोल परचुरे, समीक्षक

रामगोपाल वर्माचा सिनेमा म्हटला की,हल्ली कुतहूल वगैरे फारसं निर्माण होत नाही, उलट सिनेमा कसा असेल याबद्दल धास्तीच वाटते. दर्जेदार सिनेमांवर प्रेम करणार्‍या प्रेक्षकांचा लाडका दिग्दर्शक ही ओळख रामूने स्वत:च्या कर्मानेच उलट करुन टाकली. ‘सत्या’ हा रामगोपाल वर्माचा मास्टरपीस, सत्या म्हणजे सुन्न करणारा अनुभव, सत्या म्हणजे बंदिस्त पटकथा, सत्या म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डचा आरसा, सत्या म्हणजे तत्कालीन सिनेमांच्या कितीतरी पुढचा सिनेमा…सत्याबद्दल असं बराच वेळ, बर्‍याच अँगलनी बोलता येऊ शकतं. अंडरवर्ल्ड हा रामूचा विषय असल्याप्रमाणे सत्या नंतर रामूने कंपनी केला, सरकार केला, पण त्यानंतर सिनेमावरचं रामूचं नियंत्रणच सुटलं की काय असं वाटायला लागलं, ‘रक्तचरित्र’, ‘नॉट अ लव्ह स्टोरी’मध्ये रामूची चमक दिसली पण ‘डिपार्टमेंट’, ‘भूत रिटर्न्स’ सारख्या फ्लॉप सिनेमांचंी यादी वाढत होती, तरीही रामू थांबला नाही. ‘सत्या टू’ म्हणजे ‘सत्या’चा पुढचा भाग नाही असं तो स्वत:च सांगत असला तरी नावामुळे थोडी उत्सुकता होती, सिनेमा बघितल्यावर मात्र लक्षात आलं, सत्या जेवढा चांगला होता तेवढाच ‘सत्या टू’ वाईट आहे.

काय आहे स्टोरी?
satya 2 film review
महेश भट्ट कॅम्पच्या सिनेमांना हल्ली जुनी नावं देऊन सिक्वेल म्हटलं जातं अगदी तसाच प्रकार ‘सत्या 2′ बद्दल झालेला आहे. मूळ सिनेमाशी काहीही संबंध नाही तरीही नाव सत्या टू.. दोन्ही सिनेमांमध्ये कॉमन आहे तो म्हणजे मुंबईतला पाऊस. अर्थात, सत्यामध्ये कथेत उतरलेला पाऊस सत्या टू मध्ये मात्र उपराच वाटतो. सिनेमात नेमकं लेखकाला काय सांगायचंय तेच लक्षात येत नाही. मुंबई शहर ज्याला पूर्णपणे नवीन आहे तिथे सत्या आपलं बस्तान बसवतो. नुसतं बस्तानच नाही तर दहशतीची कंपनी सुरु करतो. कंपनीचा मास्टरमाईंड होण्याआधी तो सरकारमधल्या सुभाष नागरेसारखा अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देत असतो. हे सगळं एवढ्या कमी कालावधीत घडतं की त्यावर विश्वास ठेवणं खूपच अवघड जातं. बरं, त्यादरम्यान, त्याची प्रेमकहाणी, त्याची दोस्ती, कंपनीसाठी माणसं जमवणं, बिल्डर लॉबी आणि अंडरवर्ल्डची हाममिळवणी अशा बर्‍याच गोष्टी घडत राहतात. एकूणच, ‘सत्या टू’ खूपच फिका वाटतो. मूळ सत्याशी तुलना नाही केली तरी अंडरवर्ल्ड, पोलीस, राजकारण हे आता पंधरा वर्षांनंतर आणखी पुढे गेलंय हे ‘सत्या 2’मध्ये जाणवतच नाही.

नवीन काय?

रामूच्या गेल्या काही सिनेमांमध्ये ठळकपणे जाणवली ती कॅमेराची करामत. 5 डी सारखा कॅमेरा ज्याला अगदी कपात ठेवून, देवघरात ठेवून सिनेमा चित्रीत करता येतो, त्याचा भरमसाठ आणि अतिरेकी वापर रामूने केला. आता सत्या 2 मध्ये रामूने ‘ईगल आय व्ह्यु’ कॅमेराचा वापर केलाय, पण इथे मात्र येता जाता सतत या कॅमेराचा वापर करणं रामूने टाळलंय एवढीच समाधानाची गोष्ट आहे. या कॅमेरातून दिसणारं मुंबई शहर हीच या सिनेमाची एकमेव खासियत. बाकी सत्याचं पार्श्वसंगीत ‘सत्या टू’ मध्ये थोड्या वेगळ्या ढंगात वापरण्यात आलंय, पण सिनेमातच दम नसल्यामुळे पार्श्वसंगीत कितीही चांगलं झालं तरी त्याचा परिणाम वाटत नाही. सूत्रधार म्हणून मकरंद देशपांडेचा आवाज वापरण्यात आलाय, पण तोसुद्धा खूप कोरडा वाटतो. अंडरवर्ल्डच्या दुनियेचा नीट अभ्यास करुन रामूने वास्तववादी सिनेमे दिलेले आहेत, पण त्या सगळ्यांपुढे या सिनेमातलं अंडरवर्ल्ड हे खूपच फिल्मी वाटत राहतं. क्लायमॅक्सला ‘सत्या 3′ ची सोयही रामूने करुन ठेवलीये हे लक्षात येतं.

परफॉर्मन्स

सत्या 2 चं आणखी एक अपयश म्हणजे यातली प्रमुख पात्रं साकारणारे अभिनेतेच निस्तेज आणि निष्प्रभ वाटतात. इतर भुमिकांमध्ये अशोक समर्थसारखे ओळखीचे चेहरे आहेत, जे त्यांना दिलेलं काम चोख करतात. पण सत्या, त्याचा मित्र नारा, सत्याची गर्लफ्रेंड चित्रा हे पडद्यावर दिसत राहतात, पण त्यांचा काहीच प्रभाव पडत नाही. सत्याची भूमिका करणारा कलाकार गँगस्टर कमी आणि मॉडेल जास्त वाटतो. नेहमी कसदार कलाकारांना संधी देणारा रामू प्रमुख कलाकारांच्या बाबतीत एवढा गाफिल का राहिला असाच प्रश्न पडतो. एकंदरित, तंत्राच्या प्रेमात पडलेल्या रामूचं लक्ष कथा-पटकथा यापेक्षा तांत्रिक करामतींकडे जास्त आहे. हे प्रेम जेव्हा कमी होईल तेव्हाच रामूकडून एका जबरदस्त सिनेमाची अपेक्षा करता येईल. ‘शिवा’, ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कौन’, ‘कंपनी’ असे एकापेक्षा एक सरस सिनेमे बनवणार्‍या रामगोपाल वर्माने कमबॅक करायलाच हवं, ती इंडस्ट्रीची आणि चोखंदळ प्रेक्षकांची गरजच आहे.

रेटिंग : सत्या टू – 30

close