वानखेडेची तिकीट विक्री ठप्प, वेबसाईट क्रॅश

November 11, 2013 4:15 PM0 commentsViews: 111

wankhede match11 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या होम ग्राऊंडवर अर्थात वानखेडे स्टेडियमवर आपली शेवटची 200 वी टेस्ट मॅच खेळतोय आणि या मॅचची तिकिटं मिळवण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मात्र तिकीट विक्री करणारी वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

या मॅचच्या तिकिटांची www.kyazoonga.com या वेबसाईटवर ऑनलाईन विक्री करण्यात येतेय. आज सकाळी 11 वाजता ही वेबसाईट सुरु झाली. पण एकही तिकिटाची विक्री न होता, वेबसाईट क्रॅश झाली. एकाचवेळी हजारो जणांनी लॉगऑन केल्यानं साईट ठप्प झाली. पण वेबसाईट दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु असून थोड्याच वेळात ऑनलाईन तिकिटविक्रीला सुरुवात होईल, असं वेबसाईटतर्फे सांगण्यात आलंय.

वेबसाईटवर हजार आणि अडीच हजार रुपयांची तिकिटं उपलब्ध असून एका व्यक्तीला केवळ दोनच तिकिटं घेता येणार आहेत. तिकिटं मिळवण्यासाठी आज सकाळपासूनच वानखेडे स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेंमी प्रचंड गर्दी केली आहे. पण तिकीट खिडकी न उघडल्यानं क्रिकेटप्रेमी नाराज झाले. राज्यभरातून 5 ते 7 हजार क्रिकेटप्रेमी तिकिटं मिळवण्यासाठी आले आहेत.

 

कुणाला भेटली तिकिटं

सचिन तेंडुलकरला मानवंदना देण्यासाठी प्रत्येक सर्वसामान्य फॅन उत्सुक असला तरी त्याच्या वाट्याला ही संधी किती मिळेल हे सांगणं जरा कठीणच आहे. MCA च्या भोंगळ कारभारानं सामान्य क्रिकेट फॅन्सचं स्वप्न अपूर्ण राहणार असंच दिसतंय. कारण 33 हजार तिकिटांपैकी सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी केवळ 3 हजार ते साडेचार हजार तिकिटचं ठेवण्यात आली आहे. उर्वरित तिकिटं कोटा पद्धतीमुळे आधीच वाटण्यात आली आहेत.

- MCAशी संलग्न क्लबना 33 हजार तिकिटांपैकी 17 हजार तिकिटं
– प्रायोजक आणि सरकारी खात्यांसाठी 8 हजार तिकिटं
– कॉर्पोरेट्स आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी काही तिकिटं राखीव
– अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी प्रेस बॉक्सचा काही भागही राखीव

 

 IBN लोकमतचे सवाल

– 33,000 तिकिटांपैकी फक्त 4,500 तिकिटं सर्वसामान्य चाहत्यांना का ?
– 28,000 तिकिटं क्लब्स, प्रायोजक आणि सरकार यांना देण्यामागचं कारण काय ?
– मुंबईतल्या सर्व क्लब्सनी कुणाकुणाला तिकिटं दिली, याची माहिती जाहीर होईल का ?
– या 28,000 तिकिटांचं वाटप झालं की विक्री झाली ?
– या 28,000 तिकिटांचा काळा बाजार होतो का ?
– MCA गर्भश्रीमंतांसाठी काम करतंय का ?
– सचिनची अखेरची मॅच पाहण्याचा अधिकार सर्वसामान्य चाहत्यांना नाही का ?
– MCA सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांची फसवणूक करतंय का ?
– क्रिकेट चाहत्यांची नाराजी आणि संताप यांची दखल MCA घेणार का ?

close