‘बाबां’च्या सरकारची हॅटट्रिक !

November 11, 2013 3:48 PM0 commentsViews: 19

Image img_223122_cmongadgilsamiti_240x180.jpg11 नोव्हेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारून आज तीन वर्ष पूर्ण होत आहे. राज्याच्या राजकारणाचा अनुभव नसतानाही मुख्यमंत्र्यांनी एकीकडे राष्ट्रवादीला वेसण घातली, तर दुसरीकडे टीकेला तोंड देत आपली स्वच्छ प्रतिमा जपली आणि राज्यातलं आणि राजकारणातलं आपलं स्थान भक्कम केलं. मुख्यमंत्र्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप…

दिल्लीच्या राजकारणात रमलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव नसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी आकस्मिकपणे मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागले. आदर्श घोटाळ्याची पार्श्वभूमीवर, अस्थिर राजकीय वातावरण, भ्रष्टाचारांचे चौफेर आरोप, आक्रमक राष्ट्रवादी, अशा वातावरणात चव्हाणांनी आपल्या कारभाराला सुरूवात केली. राज्यात स्वत:चा असा कुठलाही गट किंवा समर्थक नसल्याने, पृथ्वीराज चव्हाण कसा कारभार करतील अशी सर्वांना शंका होती, मात्र स्वच्छ प्रतिमा, नियमांवर बोट ठेवून निर्णय घेण्याचा निर्धार आणि श्रेष्ठींचा भक्कम पाठिंबा या जोरावर त्यांनी आपल स्थान भक्कम केलं आणि राष्ट्रवादीला वेसनही घातली.

पूर्वीचा अनुभव लक्षात घेता चव्हाणांनी नियमानुसारच कारभार होईल याकडे कटाक्षानं लक्षं दिले. प्रशासनाला शिस्त लावली, बिल्डर लॉबीला दणका देत आपण धडाक्याने काम करतो हे दाखवून दिलं, पायभूत विकासाचे प्रकल्प, दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय आणि सार्वजनिक हितांच्या निर्णयाला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले.

त्यांच्या या कार्यशैलीमुळेच अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आणि मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत अशी ओरड राष्ट्रवादीने सुरू केली. मुख्यमंत्री फाईल्स वर सह्या करत नाहीत, फाईल्स पेंडिंग राहतात, काम रखडली जात आहेत, असं सांगत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण मी कामं झपाट्याने केली आणि अनुशेष भरून काढला, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

आदर्श घोटाळ्याचा तपास, मंत्रालयाला लागलेली आग, सिंचनाचा भ्रष्टाचार आणि भीषण दुष्काळ, या नैसर्गिक संकटं आणि प्रश्नांनी मुख्यमंत्र्यांची कसोटी पाहिली. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोटचेपी भूमिका घेतली, असा आरोप विरोधक करत आहे.

येणार्‍या काळात मुख्यमंत्र्यांची खरी कसोटी लागणार आहे. निवडणुका जशा जवळ येतायत, तशी राष्ट्रवादी आक्रमक होत चाललीये. अशा आक्रमक मित्रपक्षाला आणि विभागलेल्या स्वकीयांची मोट बांधून ते आयुष्यात पहिल्यांदाच निवडणुकीला समोरं जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची वैशिष्ट्ये
– शांत, सौम्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा स्वभाव
 उपमुख्यमंत्र्यांची वैशिष्ट्ये
– कामाचा झपाटा, तातडीनं निर्णय घेण्याची क्षमता
मुख्यमंत्र्यांची कार्यशैली

 • - प्रशासनाला शिस्त
 • - बिल्डर लॉबीला दणका
 • - पायाभूत विकासाचे प्रकल्प
 • - दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय
 • - सार्वजनिक हितांच्या निर्णयाला सर्वाधिक प्राधान्य

मुख्यमंत्र्यांची कसोटी

 • - आदर्श घोटाळ्याचा तपास
 • - मंत्रालयाला लागलेली आग
 • - सिंचनाचा भ्रष्टाचार
 • - भीषण दुष्काळ

राष्ट्रवादीला वेसण

 • - सिंचनाच्या भ्रष्टाचाराची चौकशी
 • - राज्य सहकारी बँकेवर प्रशासकांची नेमणूक
 • - बेकायदा बांधकामांना पायबंद

 

close