48 नेत्यांची सुरक्षा काढली !

November 14, 2013 4:39 PM0 commentsViews: 62

सुधाकर काश्यप, मुंबई

14 नोव्हेंबर : राज्यातल्या बर्‍याच राजकीय नेत्यांना त्यांच्या पदानुसार सुरक्षा पुरवली जाते. मात्र गेल्या काही दिवसात घेतलेल्या आढाव्यानुसार काही नेत्यांना सुरक्षेची आवश्यकता नसल्याचं लक्षात आल्यानंतर, सुमारे 48 नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलीय. तर काहींची सुरक्षा कमी करण्यात आलीय.

राज्यातल्या राजकीय, तसंच महत्वाच्या व्यक्तींना स्पेशल प्रोटेक्शन युनिट अर्थात एसपीयुद्वारे पोलीस संरक्षण दिलं जातं. या दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी प्रशिक्षित असतात. त्यांना वैयक्तिक सुरक्षा पुरवण्याबाबतचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं. मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री, मंत्री, महत्त्वाचे व्यक्ती, ठाकरे कुटुंबीय यांना एसपीयूचं संरक्षण आहे.

कोणत्या नेत्यांना कोणती सुरक्षा पुरवली जाते.

 • * एक्स
 • * वाय
 • * झेड
 • * झेड प्लस
 • * अतिमहत्त्वाच्या 144 जणांना सुरक्षा
 • * 911 एसपीयूचे अधिकारी सुरक्षेसाठी तैनात
 • * 48 नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली
 • * 342 सुरक्षा अधिकारी परत बोलावले

अशाप्रकारची सुरक्षा राज्यातल्या अतिमहत्वाच्या 144 जणांना देण्यात आली होती. त्यांना 911 एसपीयूचे अधिकारी सुरक्षेसाठी देण्यात आले होते. मात्र आता 48 राजकीय नेत्यांची आणि महत्वाच्या व्यक्तिची सुरक्षा काढण्यात आलीय. त्यांना असलेले 342 सुरक्षा अधिकारी परत बोलावण्यात आलेत.

राज्यातल्या कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलीय

 • - विजयसिंह मोहिते पाटील
 • - विजयकुमार गावित
 • - कृपाशंकर सिंह
 • - रमेश बागवे

ज्या राजकीय व्यक्तीस सुरक्षा पुरवण्यात येते,त्या व्यक्तीसं खरचं सुरक्षेची गरज आहे का याची माहिती उच्च स्तरीय समिती घेत असते.या समितीत राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे उपायुक्त, सर्व जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असतात. माहितीच्या आधारे उच्च स्तरीय समितीतील अधिकारी अहवाल तयार करतात. आणि तो अहवाल आढावा समितीकडे पाठवते. या आढावा समितीत राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक आदी अधिकारी असतात.एसपीयुची सुरक्षा पुरवण्याबाबचा अंतिम निर्णय आढावा समिती घेत असते.

आढावा समितीच्या शिफारसीनंतर अनेकांची सुरक्षा काढण्यात आलीय. मात्र, काही राजकीय नेते सुरक्षा परत करायला तयार नाहीत.आपली एसपीयुची सुरक्षा व्यवस्था कायम राहावी, म्हणून ते प्रयत्न करताहेत.

close