बाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी

November 15, 2013 3:33 PM0 commentsViews: 74

balasaheb_shivji park3315 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतिदिन 17 नोव्हेंबरला आहे. या दिवशी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुखांचे चाहते शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंही बाळासाहेबांचा पहिला स्मृती दिन हा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर आयोजित केला आहे. त्यादृष्टीने शिवसेना, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं जोरदार तयारी सुरू केलीय.

या कार्यक्रमाचं स्वरुप अतिशय अनौपचारिक असं असेल. शिवसेनेचा कोणताही नेता भाषण करणार नाही. उद्धव ठाकरेंचं भाषणही नसेल. मात्र उद्धव ठाकरे दिवसभर या स्मृतीस्थळावर असतील. पण उद्धव ठाकेरंनी दिवसभर स्मृतीस्थळावर थांबू नये उलट महापौर बंगल्यात त्यांनी बसावं आणि थोड्या वेळाच्या फरकाने अभिवादनासाठी आलेल्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी यावं अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्यात. त्यामुळे गर्दीचं व्यवस्थापन लवकर करता येणं शक्य होईल. तसंच हा परिसर सायलेन्स झोन असल्यानं आवाजाच्या मर्यादांचं पालन करावे अशी सुचनाही करण्यात आलीय, त्यामुळे या कार्यक्रमात माईकची व्यवस्थाही नसणार आहे.

मैदानात कोणतेही मंडप नसतील.आणि शिवसैनिकांना दर्शनासाठी शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारातून म्हणजेच मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळून प्रवेश देण्यात येईल. शिवाजी पार्क मैदानाकडे जाणार्‍या सगळ्या रस्त्यांवर शिवसेनेच्या 17 स्थानिक शाखांतर्फे मंडप उभारले जातील. ज्यात मुंबईबाहेरुन आलेल्या शिवसैनिकांचा चहा, नाश्ता, जेवण आणि पाण्याची सोय असेल. तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा या कामी मदत केलीय. तसंच मुंबईबाहेरुन येणार्‍या वाहनांची व्यवस्था दादर,टी. टी., तुलसी पाईप रोड तसंच माहिम फिशरमन कॉलनी परिसरात करण्यात आलीय. शिवसेना नेते आणि उपनेत्यांवर या सगळ्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आलीय तसंच पुढचे चार दिवस सेनाभवनची सुरक्षाही वाढवण्यात आलीय. तसंच शिवसैनिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

कसा असेल कार्यक्रम?

 • - कार्यक्रमाचं स्वरूप अनौपचारिक
 • - कुणीही भाषण करणार नाही, उद्धव ठाकरेंचं भाषणही नसेल
 • - उद्धव ठाकरे दिवसभर स्मृतिस्थळावर असतील
 • - पण उद्धवनी दिवसभर थांबू नये अशी पोलिसांची सूचना
 • - हलक्या आवाजात रामधून वाजवली जाईल
 • - माईकची व्यवस्था नसेल
 • - मैदानात मंडप नसतील
 • - प्रवेश फक्त शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच
 • - शिवाजी पार्ककडे जाणार्‍या रस्त्यांवर सेनेच्या 17 शाखांकडून मंडप उभारणार
 • - मंडपांत बाहेरून आलेल्या शिवसैनिकांसाठी चहा, नाश्ता, जेवणाची सोय
 • - वाहनांची व्यवस्था दादर टीटी, तुलसी पाईप रोड, माहीम फिशरमन कॉलनी परिसरात
 • - शिवसेना नेते, उपनेत्यांवर संपूर्ण देखरेखीची जबाबदारी
 • - सेनाभवनच्या सुरक्षेत वाढ
close