…आणि सचिनची बॅट अखेर थांबली

November 15, 2013 7:44 PM0 commentsViews: 31

15 नोव्हेंबर : मुंबई टेस्ट तिसर्‍याच दिवशी संपण्याची शक्यता वाढलीय आणि सचिन तेंडुलकर दुसर्‍या इनिंगमध्ये बॅटिंगला येण्याची शक्यताही मावळलीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 टेस्ट आणि 328 इनिंगनंतर सचिनची बॅट अखेर थांबली आहे.

 

126132

 

अखेर आज तो क्षण आला, मॅचच्या दुसर्‍या दिवसाच्या खेळाला एक तास उलटून गेला होता, आणि क्रिकेटच्या या बादशहाला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. सचिनची ही शेवटची इनिंग होती. वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या हजारो फॅन्सनी मास्टर ब्लास्टरला उभे राहून मानवंदना दिली, तर सचिन परतल्यानंतर स्टेडियमही रिकामं झाला.

 
आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच उत्कंठेनं, पहिल्या दिवसाच्या नॉटआऊट 38 रन्सच्या स्कोरवरुन सचिन पुढे खेळणार होता. जुन्या प्रतिस्पर्ध्याबरोबर हे हस्तांदोलन आणि मग सर्वजण दुसर्‍या दिवसासाठी सज्ज झाले. त्याचं कुटुंब, मित्र परिवार आणि फॅन्सची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. सचिनच्या बॅटिंगची मजा जास्त लुटता यावी यासाठी तर मुलगा अर्जुन चक्क आज बॉलबॉय बनला होता, तर स्टेडियममध्ये आवाज होता तो फक्त सचिन… सचिन…

 

9.30 वाजता तो बॅटिंगसाठी उतरला, अख्ख वानखेडे स्टेडियम भरलं होत. सामान्य क्रिकेटप्रेमींपासून ते बॉलिवूड आणि राजकीय व्यक्तींनीही हजेरी लावली होती. चेतेश्वर पुजाराच्या संयमी बॅटिंगपुढे सचिनने आज कमालीची आक्रमकता दाखवली.

 
पण जेव्हा सेंच्युरीची आशा वाटत होती, अगदी त्याचवेळी निओसिंग देवनारायणने सचिनच्या इनिंगला फुलस्टॉप लावला आणि अचानकपणे वास्तव सर्वांसमोर उभ ठाकल. या मास्टर ब्लास्टरच्या हातात परत कधीही बॅट दिसणार नाही, या कल्पनेने चेहर्‍यावरचे भाव हरपले होते. क्रिकेट जगतातील एका पर्वाचा अस्त झाला.

close