सचिननं अजून वर्षभर तरी खेळावं -लता मंगेशकर

November 16, 2013 8:46 AM0 commentsViews: 73

16 नोव्हेंबर : सचिन फिट आहे. त्यानं अजून वर्षभर तरी खेळावं अशी इच्छा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतल्या विशेष मुलाखतीत लतादीदींनी सचिनच्या खेळाबद्दल, त्याच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्यात. लतादीदी म्हणाल्या, सचिनने निवृत्त का व्हावावं हे अजूनही कळलं नाही. त्याने आणखी वर्षभर खेळायला पाहिजे होतं. मला अजूनही असं वाटतं की, सचिनला फोन करावा आणि त्याला विचारावं निवृत्तीचा निर्णय का घेतला ? त्याची अखेरची मॅच पाहताना खूप आठवणी दाटून आल्यात. मी माझ्या आयपॅडवर त्यांचे अनेक फोटो डाऊनलोड केले. तो आऊट झाल्यानंतर मी मॅच पाहणं सोडून दिली. सचिन हा आपल्यातला, घरचा माणूस आहे. जर घरच्या माणसाला कुठे काही लागलं तर त्याची जितकी काळजी घेतली जाते तितकीच काळजी सचिनची असते अशा भावनाही लतादीदींनी व्यक्त केल्यात. सचिनला मी पहिल्यांदा भेटले ते राज ठाकरे यांच्या घरी. त्याला मॅचमध्ये खेळताना टीव्हीवर पाहिलं होतं. पण ती पहिली वेळ होती प्रत्यक्ष भेटण्याची. राज यांच्या घरी आम्ही खूप गप्पा मारल्यात. त्या भेटीनंतर माध्यमांनी आमच्या भेटीबद्दल विचारलं तर त्याने उत्तर दिलं एका आईबद्दल मुलाला काय वाटतं ते मला वाटतंय. सचिन एका चांगला खेळाडू तर आहेच पण तो एक चांगला माणूस आहे. आता सचिनने तरूण मुलांना शिकवावं. सचिन क्रिकेटने संपन्न असा खेळाडू आहे त्यांनी आपल्यातली कला, कौशल्य हे नव्या खेळाडूंना शिकवावं आणि त्याने गोल्फ खेळावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

close