क्रिकेट माझा प्राणवायु, क्रिकेटशी नातं कायम राहिन- सचिन

November 17, 2013 7:59 PM0 commentsViews: 300

17 नोव्हेंबर :माझ्या आईने माझ्यासाठी असंख्य त्याग केले आहे. माझ्या आईप्रमाणेच देशातील अनेक मातांनीही त्यांच्या मुलांसाठी त्याग केले. अशा सर्व मातांना भारत रत्न पुरस्कार अर्पण करत असल्याचे सचिन तेंडुलकरने रविवारी सांगितले. क्रिकेट हा माझ्यासाठी ऑक्सिजन असून भारतासाठी पुन्हा बॅट हाती घेणार याचे दुःख कायम असेल अशा शब्दांत सचिनने त्यांच्या तना-मनात क्रिकेट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अवघ्या काही तासांतच सचिनला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सचिनने आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मनमोकळा संवाद साधला.  २४ वर्षांच्या स्वप्नवत प्रवासाबद्दल बोलताना सचिनने क्रिकेटचे आभार मानले. फलंदाजीत मी शतक केले असो किंवा अगदी शुन्यावर बाद झाल्यानंतरही माझ्या कुटुंबीयांनी मला नेहमीच साथ दिली. शेवटच्या कसोटीत चाहत्यांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे सचिनने सांगितले.

 

निवृत्तीपूर्वीही मी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करायचो. मात्र याची वाच्यता मी कधी केली नाही. तरुणांना मार्गदर्शन करणे, अनुभव शेअर करणे मला नेहमीच आवडते. निवृत्तीनंतरही मी तरुणांना मार्गदर्शन करत राहील असे त्याने आवर्जून सांगितले.

 

गेल्या काही महिन्यांपासून सरावात शरीर अपेक्षीत साथ देत नव्हते. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगत मी निवृत्ती स्वीकारली असली तरी कुठे ना कुठे क्रिकेट खेळून क्रिकेटविश्वाशी जोडलेला राहीन असेही त्याने सांगितले.

 

 

 

 

 

 

close