बाबा आमटेंचा पहिला स्मृतिदिन

February 9, 2009 4:14 AM0 commentsViews: 8

9 फेब्रुवारी महारोगी म्हणून ज्याला जगानं टाकलं त्यांना जवळ करून त्यांच्या जीवनात आनंद फुलवणा-या बाबा आमटे यांचा पहिला स्मृतिदिन. गेल्या वर्षी 9 फेब्रुवारीला वरो-याच्या आनंदवनात बाबांचं निधन झालं. मुरलीधर आमटे म्हणजे सगळ्यांचे बाबा आमटे. ज्यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजाला भरभरून दिलं. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा गावात बाबांनी आनंदवन उभारलं. समाजातील तळागाळाच्या लोकांना एकत्र आणून जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवला. बाबांनी कुठल्याही अपेक्षेशिवाय कार्य केलं. जेव्हा लोकं आपापसात भांडत होते सगळे एकमेकांच्या जीवावर उठले होते त्यावेळी बाबांनी भारत जोडोचा नारा दिला. आणि तरुणांच्या मनात देशभक्ती जागवली. म्हणूनच बाबांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात युवकांची त्यांना खूप साथ लाभली. त्यांच्या आभाळाएवढ्या कार्यामुळे त्यांना रॅमन मॅगासेस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांना आंतरराष्ट्रीय गांधी शांती पुरस्कारही देण्यात आला. पण त्यांनी कुठल्याही पुरस्काराचा विचार न करता त्यांचं कार्य सुरू ठेवलं. बाबांनी आपल्या शेवटच्या दिवसात सांगितलं होतं की, त्यांच्या शरीराचा प्रत्यक भाग हा या निसर्गासाठी खर्ची व्हावा, आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं शरीर आनंदवनातच दफन करण्यात आलं. अशा निसर्गाशी एकरूप असणा-या आणि कुष्ठरोग्यांना नवजीवन देणा-या बाबांचा 9फेब्रुवारीला पहिला स्मृतिदिन. त्यांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

close