‘साहेबांच्या’ आदेशावरून त्या तरुणीवर पाळत !

November 18, 2013 11:18 PM0 commentsViews: 2604

amit sha18 नोव्हेंबर : गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा आणि गुजरात एटीएसमधले आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्यामधीलं फोनवरचं संभाषण ‘कोब्रा पोस्ट’नं उघड केलंय. गुजरातच्या गृहमंत्रालयाने 2009 मध्ये एका तरुणीवर पाळत ठेवल्याचं या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालंय. विशेष म्हणजे अमित शहा यांनी आपल्या ‘साहेबांच्या’ सांगण्यावरून त्या मुलीवर पाळत ठेवली आणि यावरूनच आता वाद निर्माण झालाय.

अशाप्रकारे एखाद्यावर विशेषत: एका स्त्रीवर पाळत ठेवणे, हे व्यक्तीस्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा आरोप होतोय. कायद्यानुसार जर कुणावर अशा प्रकारे पाळत ठेवायची असेल तर गृहमंत्रालयाला एक पत्र द्यावं लागतं. पण या प्रकरणामध्ये अशी कोणतीही लेखी नोंद नाही. ही तरुणी आर्किटेक्ट आहे. आणि कच्छमधल्या भूकंपानंतर ती कच्छ रिकन्स्ट्रक्शन प्रोजेक्टची कॉन्ट्रॅक्ट्स तिला देण्यात आली होती. 2009 मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. ती बंगलोरमध्ये राहत होती तेव्हा रेस्टॉरंट, मॉल, जिम या सगळ्या ठिकाणी तिचा पाठलाग केला गेला.

ती तिच्या आजारी आईला भेटण्यासाठी अहमदाबादमधल्या हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हाही तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. जेव्हा ती विमान प्रवास करायची तेव्हा तिच्यामागे पोलीस कर्मचारी साध्या वेशात बसलेला असायचा. अगदी हॉटेलमध्ये चेक इन करताना तिच्यावर लक्ष असायचं. ती कुठेकुठे जाते, काय करते याबद्दलचा सगळा तपशील आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल गृहराज्यमंत्री अमित शहांना देत होते. तरुणीवर पाळत ठेवण्याचे आदेश अमित शहांना देणारे ते साहेब कोण यावरून आता वाद पेटलाय.

अमित शहा आणि IPS अधिकारी सिंघल यांच्यात झालेल्या संभाषणाची टेप कोब्रा पोस्टनं उघड केलीय. हे संभाषण…

 • सिंघल – हॅलो. सर सिंघल बोलतोय.
 • अमित शाह – जी.
 • सिंघल – सर, मला कंपनीकडून आत्ताच माहिती मिळाली आहे की दुपारी 2.29 वाजता लोकेशन तिथेच आहे.
 • अमित शाह – ती गेली असेल. साहेबांना सगळं समजतं.
 • सिंघल – नाही.
 • अमित शाह – ती गेलीच असणार. साहेबांना सगळं काही समजतं.
 • अमित शाह – सिंघल, अमित बोलतोय. नीट लक्ष ठेव.
 • सिंघल – आपला एक माणूस हॉटेलच्या पार्किंग एरियामध्ये आहे, एक बाहेर आहे आणि अजून एक माणूस ठेवला आहे.
 • अमित शाह – ते अजूनही आत आहेत.
 • सिंघल – ते अजून बाहेर आले नाहीयेत. त्यामुळे ते कदाचित आतच असावेत.
 • अमित शाह – ते आज जेवण्यासाठी बाहेर जाणार आहेत.
 • सिंघल – बरोबर. बरोबर.
 • अमित शाह – साहेबांना याबद्दल फोन आला होता.
 • सिंघल – जी जी.
 • अमित शाह – ती कुणासोबत चालली आहे, म्हणून लक्ष ठेव.
 • सिंघल – सर.
 • अमित शाह – तो मुलगा तिला भेटायला येणार आहे.
 • सिंघल – जी जी.
 • अमित शाह – साहेबांना सगळी माहिती कळते. त्यामुळे आपण कुठे कमी पडलो, तर त्यांना लगेच लक्षात येईल.
 • सिंघल – जी जी.

भाग 3.

 • अमित शाह – सिंघल…
 • सिंघल – सर.
 • अमित शाह – आपण कुणाला मुंबईच्या विमानात पाठवू शकतो का?
 • सिंघल – ममम…
 • अमित शाह – तिथे काही तरी होणार, अशी साहेबांना पक्की खबर आहे. म्हणून कुणाला तरी विमानात पाठवायला हवं.
 • सिंघल – होय सर. मी कुणला तरी पाठवतो.
 • अमित शाह – थोडे पैसे द्या आणि पाठवा विमानात. आणि तिने विमानतळावरच्या STD/PCOवरून फोन केला, तर नंबर चेक करा.
 • सिंघल – राइट, सर.
 • अमित शाह – आज एअरपोर्टहून..
 • सिंघल – जी सर.
 • अमित शाह – नंबर नक्की चेक करा.
 • सिंघल – होय सर.

हायकोर्टाच्या न्यायमूतीर्ंमार्फत चौकशी करा !

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाद निर्माण झालाय. संभाषणात उल्लेख असलेले हे ‘साहेब’ कोण, असा प्रश्न काँग्रेस नेते विचारत आहेत. तसंच या प्रकरणाची हायकोर्टाच्या न्यायमूतीर्ंमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही केलीय. काँग्रेसच्या महिला नेत्यांनी यावरून नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. महिलांबद्दल असा दृष्टकोन बाळगणारे पंतप्रधानपदाची स्वप्न बघत आहेत असा आरोपही काँग्रेसने केलाय. महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजपविरोधात अहमदाबाद, दिल्ली आणि मुंबईत निदर्शनंही केली. दरम्यान, आपल्याविरोधात खोटा प्रचार केला जात असल्याचा प्रतिआरोप नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात घेतलेल्या रॅलीत केला.

close